महिला आयोग सुनावणी : २० तक्रारींचा निपटारानागपूर : महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये महिलांच्या लैंगिक छळांच्या तक्रारींचे प्रमाण अधिक असल्याचे सुनावणीदरम्यान दिसून आले आहे. यात सरकारी अधिकाऱ्यांकडून आणि खाजगी कंपन्यांमधील तक्रारींचा समावेश आहे.‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत दर महिन्याला आयोगाकडून नागपुरात सुनावणी होते. त्यानुसार शनिवारी नागपूरमधील रविभवनात आयोगाच्या सदस्य अॅड. विजया बांगडे यांच्या उपस्थितीत महिलांच्या तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत चाललेल्या सुनावणीदरम्यान आयोगाकडे एकूण ४० तक्रारींचा समावेश होता. यापैकी जुन्या २० तक्रारींवर समेट घडवून आणण्यात आला. महिलांना मुंबईला जाणे शक्य नसते.त्यामुळे नागपूरमध्ये सुनावणी घेतली जाते. त्यामुळे महिलांच्या तक्रारींचे प्रमाण खूप वाढले आहे. विशेषत: सरकारी कार्यालयात आणि खाजगी कंपन्यांमध्ये वरिष्ठांकडून होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींचे प्रमाण यात अधिक असल्याचे बांगडे यांनी स्पष्ट केले. शनिवारी प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये एक बीडीओ आणि शिक्षण अधिकाऱ्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार आली. एका बड्या खाजगी कंपनीतील महिलांनीही आयोगाकडे याच मुद्यावर दाद मागितली होती. कंपनीला यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. कंपनीचे अधिकारी सुनावणीदरम्यान उपस्थित होते. त्यांनी महिलांना पुरेशी सुरक्षा प्रदान करण्याची हमी दिली.कौटुंबिक वादातून विभक्त झालेले दोन दाम्पत्य आयोगाने त्यांच्यात समेट घडवून आणल्याने आनंदीत होते. संसाराची गाडी नव्याने सुखाच्या वाटेवर आल्याबद्दल हे दाम्पत्य शनिवारी बांगडे यांना भेटले व कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विभागीय समन्वयक प्रतिभा गजभिये, आयोगाच्या समुपदेशक वैशाली केळकर, परिणीती बालपांडे, ए.डी. चांदूरकर, विधी सल्लागार अमिता खोब्रागडे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे, समन्वयक एस.एम. बोंडे, अनिल रेवतकर उपस्थित होते.(प्रतिनिधी)
लैंगिक छळाच्याच तक्रारी अधिक
By admin | Updated: September 7, 2014 00:55 IST