ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 25 - खबरदारीच्या संपूर्ण उपाययोजना करून पोलीस शिपाई ते पोलीस आयुक्तांपर्यंतच्या प्रत्येक कर्मचारी अधिका-याने मराठा मोर्चाचा नियोजनबद्ध बंदोबस्त केला. त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडली नाही. भव्य मोर्चा सुरू असतानाच त्या-त्या भागातील वाहतूकही सुरळीत सुरू होती, हे मोर्चेकरी आणि पोलिसांच्या नियोजनबद्धतेचे आदर्श उदाहरण ठरले. प्रत्येक मोर्चाच्या वेळी पोलीस प्रचंड दडपण घेऊन बंदोबस्ताची तयारी करायचे. यावेळी राज्यभरातील मराठा मोर्चात सहभागी होणा-या मोर्चेक-यांची संख्या सा-यांसाठीच त्यातल्या-त्यात पोलिसांवर जास्तच दडपण वाढविणारी ठरली.दिवाळीच्या निमित्ताने उपराजधानीतील बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी आहे. तशात मोर्चेक-यांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वाहने येणार, त्यामुळे शहरात माणसांची अन् रस्त्यावर वाहनांची गर्दी होईल. परिणामी वाहतूकीचा खोळंबा आणि नागरिकांची कुचंबना होईल, ही भीती असल्यामुळे पोलीस प्रशासन प्रचंड दडपणात आले होते. मात्र, मोर्चा बंदोबस्ताचे आव्हान स्विकारत पोलिसांनी बंदोबस्ताचे चांगले नियोजन केले. मोर्चा जेथून सुरू होईल त्या रेशिमबागेपासून तो समारोपाच्या कस्तुरचंद पार्कपर्यंत कोणता पोलीस अधिकारी आणि कोण पोलीस कर्मचारी कोणती जबाबदारी पार पाडेल, ते निश्चित करण्यात आले. आयोजकांशी चर्चा करून त्यांना काय खबरदारी घ्यायची ते सांगण्यात आले. कोणतीही गडबड अथवा गोंधळ होऊ नये म्हणून साध्या वेषातील मोठ्या संख्येत महिला आणि पुरूष कर्मचारी कर्तव्यावर नेमण्यता आले. हे सर्व करतानाच मोर्चेक-यांनीही शिस्तीचा आदर्श निर्माण केला. कसलाही गोंधळ, गोंगाट न करता शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चेकरी रस्त्याने चालत होते. त्यामुळे पोलीस दडपणमुक्त झाले. बाल मोर्चेकरी अन् पोलिसांचा सेवाभाव मोर्चेक-यांमधील वृद्ध आणि लहानग्यांना पोलिसांनी चांगली मदत केली. शुक्रवारी तलावाजवळच्या मार्गावरील पेट्रोल पंपानजिक एक वृद्ध मोर्चेकरी भोवळ येऊन खाली पडले. वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी लगेच धावले. त्यांनी वृद्धाला बाजूला सावलीत घेतले. एकाने पाणी पाजले. दुस-याने बिस्कीट चारले. काही वेळेनंतर हुरूप आल्याने वृद्ध उभे झाले. त्यांना हात पकडून पुन्हा पोलिसांनी मार्गस्थ केले. आईच्या खांद्यावरून उतरून खाली चलण्यासाठी गडबड करणा-या काही बाल मोर्चेक-यांनाही पोलिसांनी बिस्कीट चॉकलेट देऊन शांत केले. थंड पाण्याचे पाऊच देऊन अनेक वृद्ध महिलांना रस्त्याने चलण्यासाठी प्रोत्साहित करण्याची भूमिकाही पोलिसांनी वठवली.
ड्रोनची नजर, वाहतूक शाखाही दक्षशहर पोलिसांनी पहिल्यांदाच मोर्चावर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला. मोर्चेक-यांसोबत व्हीडीओ कॅमेरे होतेच. पोलिसांनी पहिल्यांदाच ड्रोनच्या माध्यमातून मोर्चावर नजर ठेवली. कस्तूरचंद पार्कजवळ कमांडोचे पथकही सज्ज होते. या मोर्चात वाहतूक पोलिसांनी कमालीची प्रशंसनीय भूमिका वठवली. एवढ्या मोठ्या संख्येत मोर्चेकरी रस्त्यावरून चालत असताना कुठेही वाहतुकीचा खोळंबा झाला नाही. मोर्चा येत असलेल्या भागातील समोरच्या चौकातील रस्ता पोलीस मोकळा करीत होते. दुसरे म्हणजे, मोर्चाने जो चौक ओलांडला तो चौक लगेच वाहतूकीसाठी मोकळा केला जात होता. त्याचमुळे कुठेही जबरदस्तीने वाहनधारकांना अडकून पडावे लागले नाही. पोलीस उपायुक्त रविंद्रसिंग परदेसी, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यासह बहुतांश पोलीस उपायुक्तांनी त्यांच्या त्यांच्या परिमंडळात मोर्चेक-यांच्या अनुषंगाने बंदोबस्त हाताळला.