एनटीसीएचा विरोध : वन मंत्रालयाचा अफलातून निर्णय नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) व राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या नकारानंतरही केवळ ताडोबा-अंधारी येथील काही रिसोर्ट मालकांच्या दबावात वन मंत्रालयाने तडकाफडकी आदेश जारी करू न ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्पांसह विदर्भातील अभयारण्यात ‘मान्सून सफारी’ सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार गत २ जुलैपासून पेंच व ताडोबासह बोर व उमरेड-कऱ्हांडला येथे ‘मान्सून सफारी’ सुरू करण्यात आली आहे. माहिती सूत्रानुसार, एनटीसीएने गत जून महिन्यात वन विभागाला एक पत्र जारी करू न, पावसाळ्यात जंगल सफारी बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनीसुद्धा जंगल सफारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर लगेच जून महिन्याच्या शेवटी एक पत्र जारी करून सर्व जंगल सफारी बंद करण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या होत्या. परंतु १ जुलै रोजी वन विभागाला अचानक वन मंत्रालयाकडून ‘मान्सून सफारी’ सुरू ठेवण्याचे निर्देश प्राप्त झाले. माहिती सूत्रानुसार, ताडोबा येथील काही रिसोर्ट मालकांनी तीन महिने जंगल सफारी बंद ठेवण्याचा विरोध केला होता.मात्र दुसरीकडे वन मंत्रालयाच्या या निर्णयावर वन अधिकारी व कर्मचारी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. परंतु थेट वन मंत्रालयाचे आदेश असल्याने कुणीही खुलेआम बोलण्यास नकार देत आहेत. वन अधिकाऱ्यांच्या मते, पावसाळ्यातील सफारी जंगलातील सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी धोकादायक ठरू शकते. या दिवसांत अनेक प्राणी रस्त्यावर येतात. त्यामुळे ते गाडीखाली येऊन मरण्याची भीती असते. शिवाय यानिमित्ताने तीन महिन्यांसाठी जंगलातील पर्यटकांची वर्दळ थांबून वन्यप्राण्यांना मुक्तसंचार करण्याची संधी मिळत असल्याचेही ते म्हणाले. परंतु ‘मान्सून सफारी’च्या निर्णयाने आता वन्यप्राण्यांचा तोही हक्क हिरावून घेतला आहे. (प्रतिनिधी)
रिसोर्टवाल्यांच्या दबावात ‘मान्सून सफारी’!
By admin | Updated: July 15, 2015 03:24 IST