विद्यापीठाच्या स्वच्छ भिंतीवर केली जाहिरातीची घाण : प्रशासनाचे मौन कशासाठी ?नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छता अभियानाचा त्यांच्याच भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला (अभाविप) विसर पडलेला दिसतो. कारण नागपूर विद्यापीठाने सुरक्षा भिंतीची नुकतीच साफसफाई करून रंगरंगोटी केली, त्यावर अभाविपने जाहिराती लिहून स्वच्छता अभियानाला हरताळ फासला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने काही दिवसांपूर्वीच विद्यापीठ परिसराच्या सुरक्षा भिंतींना रंगरंगोटी करून स्वच्छ केले होते. त्याचप्रमाणे विद्यापीठ लायब्ररी परिसराच्या सुरक्षा भिंतीची साफसफाई करण्यात आली होती. रंगरंगोटी करून स्वच्छ केलेल्या या चमकदार भिंतीमुळे विद्यापीठालाही झळाळी आली होती. मात्र विद्यापीठाची ही चमक अभाविपच्या पदाधिकाऱ्यांना सलत होती की काय, त्यांनी जाहिराती लिहून विद्यापीठाच्या सर्व मेहनतीवर पाणीच फेरले आहे. लायब्ररी आणि विद्यापीठाच्या भिंतींचे विद्रुपीकरण पाहून सुजाण नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्यांवरच्या कोणत्याही भिंतींचा विविध संस्थांकडून जाहिरातीसाठी सर्रासपणे वापर केला जातो. मात्र अभाविपसारख्या जबाबदार संघटनेने विद्यापीठाच्या स्वच्छ भिंतीवर जाहिराती लिहून त्यांना विद्रुप करावे, ही बाब अशोभनीय असल्याचे बोलले जात आहे. जाहिरात करायचीच होती तर महापालिकेत रीतसर पैसे भरून जाहिरातीचा फलक लावावा, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. स्वच्छता ही केवळ कचऱ्याशीच संबधित नसते, तर आपल्या घराच्या व आसपासच्या भिंती स्वच्छ आहेत की नाही याचेही महत्त्व असते. हे मात्र अभाविपच्या पदाधिकाऱ्यांना कदाचित माहिती नसावे. यात युवकांना जुळण्याचे आवाहन केल्या जात आहे. असे विद्रुपीकरण करून विद्यार्थ्यांना काय संदेश दिला जाईल, हे जबाबदार संघटनेला सुचू नये, हीच शोकांतिका आहे. (प्रतिनिधी)एबीव्हीपी सफाई करणार का?लाखो रुपये खर्च करून विद्यापीठाने भिंतींची रंगरंगोटी केली. आता अभाविपचे जबाबदार पदाधिकारी व कार्यकर्ते जाहिराती लिहून विद्रुप केलेल्या भिंतींची साफसफाई करणार का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.विद्यापीठाने कारवाई का केली नाही?कोणाच्याही मालमत्तांवर जाहिराती लावून त्याचे विद्रुपीकरण करण्याच्या विरोधात शासनाने कायदा करून दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे. जाहिरात लावण्यासाठी संबंधित मालमत्ताधारकाकडून रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अभाविपने विद्यापीठाची परवानगी घेतली होती का, आणि नसेल घेतली तर विद्यापीठाने कारवाई करण्याबाबत काही हालचाली केल्या का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
मोदींच्या स्वच्छता अभियानाला ‘अभाविप’चा खोडा !
By admin | Updated: August 3, 2015 02:45 IST