जीवन रामावत ल्ल नागपूरविदर्भातील शेतकरी अगोदरच अतिवृष्टी, दुष्काळ व नापिकीच्या चक्रव्यूहात फसला आहे. यात अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत. शिवाय अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. असे असताना काही मार्केटिंग कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या भोळेभाबडेपणाचा गैरफायदा घेऊ न, त्यांची लाखो रुपयांनी फसवणूक केली आहे. एवढेच नव्हे, तर संबंधित कंपन्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करू न, स्वत: मालामाल झाल्या आहेत. या घटनांमुळे विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नैराश्य पसरले आहे. शिवाय अनेकांनी आता आम्हीही आत्महत्या करावी का? असा शासन व प्रशासनापुढे सवाल उपस्थित केला आहे. कंपनीच्या उलट्या बोंबा यासंबंधी मेसर्स दिशा ग्रीन हाऊ सेसचे पांडुरंग महाजन यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी शेतकऱ्यांनीच त्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, शेतकऱ्याने स्वत: पॉलीहाऊ स व शेडनेट माझ्या माणसांकडून खोलून घेतले. यासंबंधी आपण बँक व कृषी अधिकाऱ्यांना पत्रसुद्धा दिले आहे. शेतकरी हा योग्य व्यक्ती नाही. त्याने माझ्यासह बँक व शासनाची फसवणूक केली आहे. उलट तोच आमच्यावर आरोप करीत आहे, ते पूर्णत: चुकीचे आहे. शेतकऱ्यानेच आम्हाला काम पूर्ण करू दिले नाही, असेही महाजन म्हणाले. काही शेतकऱ्यांनी आयुष्यभर रक्ताचे पाणी करू न म्हातारपणात पोट भरण्याचे साधन म्हणून दोन-चार एकर शेती जमविली आहे. तसेच काही वडिलोपार्जित शेतीचे जतन करीत आहे. मात्र मार्केटिंग कंपन्यांनी या शेतकऱ्यांच्या शेतीवर डाका टाकून, त्यांच्या सर्व शेती बँकेकडे गहाण केल्या आहेत. त्या कंपन्यांमध्ये नागपुरातील पर्णनेत्र मार्केटिंग कंपनी, नोबल एक्सप्लोकेम लिमिटेड, बायोनिक्स कंपनी व जळगाव येथील दिशा ग्रीन हाऊ सेस कंपनीचा समावेश आहे. या सर्व कंपन्यांनी कुणाला पॉलीहाऊ स, कुणाला शेडनेट तर कुणाला औषधी वनस्पती शेतीच्या नावाखाली लाखो रुपयांनी फसवणूक केल्याच्या तक्रारी ‘लोकमत’कडे प्राप्त झाल्या आहेत. यासाठी संबंधित कंपन्यांनी बँका व कृषी अधिकाऱ्यांशी संगनमत करू न, हा सर्व प्रताप केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आजपर्यंत एकाही कंपनीविरुद्ध कोणतीही कारवाई झालेली नाही. दुसरीकडे त्या मोबल्यात शेतकऱ्यांच्या नशिबी कर्जबाजारीपणा आला आहे. अनेक बँकांनी आता कर्जवसूलीसाठी शेतकऱ्यांमागे तगादा लावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भूकतहान हरपून रात्रीची झोपही उडाली आहे. अशा संकटात सापडलेले शेतकरी रोज कधी पोलीस विभाग तर कधी कृषी विभागाचा उंबरठा झिजवित आहे. मात्र त्यांना आजपर्यंत कुठेही न्याय मिळालेला नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीतून भरघोष उत्पन्नाचे आमिष दाखवून या मार्केटिंग कंपन्यांची शेतकऱ्यांची लाखो रुपयांनी फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे, यासंबंधी शेतकऱ्यांनी देशाचे पंतप्रधानांपासून तर राज्याचे मुख्यमंत्री, कृषिमंत्री, पोलीस विभाग व स्थानिक कृषी अधिकाऱ्यांकडे अनेक लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र रोज शेतकरी हिताच्या गप्पा मारणाऱ्या कुणीही आजपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिलेला नाही.
शेतीवर ‘आधुनिक’ दरोडा
By admin | Updated: June 30, 2015 02:58 IST