चार मालमत्ता जप्त : सक्करदऱ्यातील दुकानांना आज कुलूप ठोकणारनागपूर : एलबीटीमुळे महापालिकेची तिजोरी रिकामी असताना दुसरीकडे मालमत्ता करापासूनही अपेक्षित उत्पन्न झालेले नाही. त्यामुळे आता महापालिकेने कर न भरणाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत नेहरूनगर झोनने तीन व आसीनगर झोनने एक मालमत्ता जप्त केली आहे. याशिवाय कर थकीत असल्यामुळे सक्करदरा चौकाजवळील शासकीय आयुर्वेदिक कॉलेज परिसरातील ७८ दुकानांना कुलूप ठोकण्याची कारवाई उद्या, शुक्रवारी केली जाणार आहे.नेहरूनगर झोनने कर थकबाकीदारांविरुद्ध कारवाई करीत एका दुकानाला कुलूप ठोकले. सक्करदरा चौक परिसरातील आयुर्वेदिक चिल्लर दुकानदार संघटनेची दोन दुकाने जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे संबंधित मालमत्तेची खरेदी- विक्रीचे कुठलेही व्यवहार करू नये, असे दुय्यम निबंधक कार्यालयासही कळविण्यात आले आहे. सोबतच जप्त केलेल्या मालमत्तेवर नागपूर महापालिकेचे नाव चढविण्यासाठी नगर भूमापन कार्यालयासही कळविण्यात आले आहे. संबंधित मालमत्ताधारकांनी दंडासह कर भरला नाही तर संपूर्ण मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे. आयुर्वेद कॉलेज परिरातील आणखी ७८ दुकानदारांकडे कर थकीत आहे. काही दुकानदारांनी तर २००६ पासून कर भरलेला नाही. अशा एकूण ७८ दुकानांना शुक्रवारी कुलूप ठोकले जाणार आहे. आसीनगर झोनने जनाबाई सारवे यांच्याकडे ८१ हजार रुपयांवर कर थकीत असल्यामुळे जप्ती कारवाई करण्यात आली. याशिवाय कर थकीत असलेल्या मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आली. (प्रतिनिधी)नारीतील ७७ भूखंडांनातीन दिवसांची मुदत मौजा नारी खसरा क्रमांक १०/१ बोंद्रे ले-आऊट येथील ७७ खुल्या भूखंडावर १३ लाख ३१ हजार रुपये कर थकीत आहे. संबंधितांनी तीन दिवसात कर न भरल्यास भूखंड जप्तीची कारवाई करण्याचा इशारा आसीनगर झोनने दिला आहे. अडीच महिने दमछाक करणारे जानेवारीचे १५ दिवस गेले असले तरी फक्त ४० टक्केच करवसुली झाली आहे. पुढील अडीच महिने वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी कर विभागाची दमछाक होणार आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रत्येक झोनची आढावा बैठक घेणे सुरू केले आहे. या बैठकीत ते प्राधान्याने कर वसुलीचा आढावा घेत असून वसुली कमी आढळून आलेल्या झोनच्या सहायक आयुक्तांची कानउघाडणी केली जात आहे. यामुळे आता एकूणच कर विभाग जोमाने कामाला लागला आहे.
कर वसुलीसाठी मनपाची जप्ती मोहीम
By admin | Updated: January 16, 2015 00:57 IST