लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : तृणमूल काँग्रेसशी संबंध तोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी सोमवारी मुंबईऐवजी कोलकात्याचे मतदार अशी नवी ओळख मिळवली. त्यामुळे त्यांना भाजपची उमेदवारी जाहीर होईल, अशी चर्चा होती. परंतु, मंगळवारच्या जवळपास अंतिम उमेदवार यादीतही त्यांचे नाव झळकले नाही.
गेल्या ७ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परेड ग्राउंडवरील प्रचारसभेत हजेरी लावलेले मिथुन चक्रवर्ती यांनी सोमवारी कोलकात्यातील काशीपूर-बेलगाछिया मतदारसंघात मतदार म्हणून त्यांचे नाव नोंदविले. भाजपने दिलेली त्या मतदारसंघाची उमेदवारी तपन साहा यांनी नाकारली असल्याने तिथून त्यांना रिंगणात उतरविले जाईल, अशी चर्चा होती. परंतु, भाजपने मंगळवारी जाहीर केलेल्या १३ उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव नाही. अर्थात, ते भाजपचा प्रचार करणार आहेत. पुढच्या मंगळवारी, ३० मार्चला ते ममता बॅनर्जी लढत असलेल्या नंदीग्राममध्ये भाजपचे उमेदवार शुभेन्दू अधिकारी यांचा प्रचार करणार आहेत. भाजपची ही अंतिम यादी समजली जात असली तरी ज्या पद्धतीने एका पाठोपाठ उमेदवार बदलले जात आहेत, ते पाहता मिथुनदांना अजूनही उमेदवारी दिली जाऊ शकते.
अशोक लहिरी, सुब्रत साहा रिंगणात
* भाजपने मंगळवारी जारी केलेल्या यादीनुसार पंतप्रधानांचे निवृत्त मुख्य आर्थिक सल्लागार अशोक लहिरी यांना अलिपूरद्वारऐवजी बालूरघाट मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे.
* काश्मीरमध्ये कसोटीच्या काळात लष्करी सेवा देणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल सुब्रत साहा हे दक्षिण कोलकात्यामधील राशिबहारी मतदारसंघात भाजपचे उमेदवार असतील.
* राजकीयदृष्ट्या जागरूक मतुआ समाजाची, विशेषत: खा. शांतनू ठाकूर यांची नाराजी दूर करण्यासाठी गाईघाटा मतदारसंघात खासदारांचे बंधू सुब्रत ठाकूर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.