नागपूर : जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या आपसी वादात अडकलेल्या शिक्षकांच्या ओडी कर्ज कपातीचा वाद पेटला आहे. जिल्हा बँकेतील सर्व खात्यावरील व्यवहार करण्याला रिझर्व्ह बँकेने बंदी घातली आहे. असे असूनही त्याच बँकेच्या खात्यावरील धनादेशाव्दारे शिक्षकांच्या कर्ज कपातीची रक्कम वळती केली जात आहे. या प्रकरणात संबंधित गटविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी शिक्षक संघटनांनी केली आहे.जिल्हा बँकेत अडकलेल्या जि.प.च्या १४६ कोटीच्या ठेवीची वसुली व्हावी. यासाठी ३७७३ ओडीधारक शिक्षक व कर्मचाऱ्यांचा जाणीवपूर्व छळ सुरू असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. एप्रिल २०१४ पासून दर महिन्याला १ कोटी ६२ लाख याप्रमाणे आतापर्यत १८ कोटीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आली आहे. परंतु ती शिक्षकांच्या कर्ज खात्यात जमा झालेली नाही. वास्तविक ज्या बँकेतून वेतन दिले जाते. त्याच बँकेच्या धनादेशव्दारे ओडी कर्जाची कपात वळती व्हायला हवी. असे न करता जिल्हा बँकेच्या धनादेशाव्दारे वळती केली जात आहे. व्यवहार बंद असलेल्या बँकेतील कर्ज खात्यावरील धनादेशाव्दारे कर्ज कपातीची रक्कम वळती करणे हा बेकायदेशीर व्यवहार असल्याची माहिती संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.(प्रतिनिधी)
कर्ज कपातीत शिक्षकांची दिशाभूल
By admin | Updated: March 6, 2015 00:26 IST