विद्यापीठातील नाणी प्रकरण : आठवडाभरात प्रशासन करणार पोलीस तक्रारनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभागातून वाकाटककालीन नाणी गायब झाल्याच्या प्रकरणात पोलीस तक्रार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात दोन वर्षांपूर्वी नेमलेल्या चौकशी समितीचा गहाळ अहवाल सापडला असून यातून नाणी गायब झाल्याचे स्पष्ट होत आहे. काही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून प्रशासनाकडून आठवडाभरात पोलीस तक्रार करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.१९६७ साली पवनारजवळील शेतात सापडलेली दोनशेहून अधिक नाणी विभागात आता नसल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती. याबाबत तत्कालीन प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी चौकशी समिती गठित केली होती. या समितीने अहवाल सादर केला होता. परंतु हे प्रकरण प्रसिद्धीमाध्यमांमध्ये आल्यानंतर हा अहवालच सापडत नव्हता. दरम्यान, विद्यापीठाने पोलीस तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतु विद्यापीठाकडे विभागात नाणी असल्याची नोंद नाही. शिवाय या नाण्यांची किंमत तसेच इतर माहितीदेखील उपलब्ध नाही. त्यामुळे अंतर्गत चौकशी करून ठोस अहवाल सादर झाल्यावरच तक्रार दाखल होईल, असे अंबाझरी पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे ऐनवेळी विद्यापीठाला माघार घ्यावी लागली होती. संबंधित अहवाल हा अनुपकुमार यांच्याकडे असल्याची माहिती कुलगुरूंना मिळाली व त्यांनी यासंदर्भात त्यांना पत्र पाठवून अहवाल देण्याची विनंती केली.अनुपकुमारांनी हा अहवाल कुलगुरूंकडे पाठविला आहे. या अहवालात झालेल्या सर्व प्रकाराची सखोल नोंद असून २१६ नाणी विभागातून गायब झाल्याचे अहवालावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे पोलीस तक्रार करण्याचा आमचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रक्रियेत काही त्रुटी राहू नये यासाठी प्रशासकीय तयारी करण्याची आवश्यकता आहे. विभागप्रमुख डॉ.प्रीती त्रिवेदी यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी साधारणत: आठवडाभर कालावधी लागेल व त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले.अनुपकुमारांकडे अहवाल कसा ?या प्रकरणात अनुपकुमार यांनी २०१४ मध्ये चौकशी समिती नेमली होती. या समितीने १५ जुलै २०१४ रोजी अनुपकुमार यांच्याकडे अहवाल सोपविला होता. त्यानंतर १० आॅक्टोबरपर्यंत अनुपकुमार विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून जबाबदारी सांभाळत होते. त्यानंतर त्यांनी हा अहवाल प्रशासनाकडे देणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता त्यांनी तो स्वत:जवळ का ठेवला याबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत अनुपकुमार यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क केला असता, त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मी आता विद्यापीठाशी संबंधित नाही, त्यामुळे प्रतिक्रिया देण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले. परंतु विद्यापीठाशी आता संबंध नाही तर मग त्यांनी इतके दिवस इतक्या महत्त्वाच्या प्रकरणाचा अहवाल स्वत:जवळ कुठल्या कारणामुळे ठेवला याबाबतचे गूढ वाढले आहे. (प्रतिनिधी)
गायब झालेला अहवाल सापडला
By admin | Updated: April 29, 2016 02:55 IST