ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २३ - श्रध्दानंद अनाथालयातून एक १७ वर्षांची मुलगी रविवारी दुपारी बेपत्ता झाली. गेल्या आठवड्यात या अनाथालयातील तीन महिन्यांच्या चिमुकलीचा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचे प्रकरण वादग्रस्त ठरले असतानाच आता युवती बेपत्ता झाल्यामुळे अनाथालयाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.
अनाथालय प्रशासनाने प्रतापनगर ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी रविवारी दुपारी १.३० आणि सायंकाळी ६ या वेळी होणा-या प्रार्थनेत अनुपस्थित होती. त्यामुळे सायंकाळी मुलगी बेपत्ता झाल्याची कुजबूज सुरू झाली. त्यानंतर प्रशासनाने प्रतापनगर पोलिसांना कळविले. पोलिसांनी मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद केली. मात्र, मुलगी बेपत्ता कशी काय झाली, त्याबाबत प्रशासन किंवा पोलीस काही सांगायला तयार नाहीत.
विशेष म्हणजे, तीनच दिवसांपूर्वी या अनाथालयातील तीन महिन्यांची चिमुकली तापाने फणफणून वारली. तिला तातडीने चांगल्या डॉक्टरकडे नेण्याचे अनाथालय प्रशासनाने टाळल्यामुळेच त्या निष्पाप चिमुकलीचा जीव गेल्याचा आरोप ही घटना उघडकीस आल्यापासून सुरू आहे. गेल्या वर्षी एका मुलीने अनाथालयाजवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती.
त्यावेळीही अनाथालय प्रशासनावर अनेक आरोप झाले होते. आता चिमुकलीच्या मृत्यूचे प्रकरण ताजेच असताना युवती बेपत्ता झाल्याने अनाथालय प्रशासनाचा वादग्रस्त कारभार चर्चेला आला आहे. याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता, चौकशी सुरू असल्याचे नेहमीचे उत्तर पोलिसांकडून मिळत आहे.