नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वेच्या बांधकामाची पहिली आॅनलाईन निविदा २० मे रोजी उघडणार आहे. संबंधित कंपनीला कंत्राट मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या अंतर्गत बांधकामाला सुरुवात होणार आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मूर्तरूप देण्यासाठी पहिली निविदा १८ एप्रिलला आॅनलाईन प्रकाशित केली होती. ८० कोटी रुपयांच्या या निविदेला एनएमआरसीएलच्या वेबसाईटवर अपलोड केले आहे. वर्धा रोडवर नागपूर विमानतळ विभागात शिवणगाव रोड ते खापरीपर्यंत ४.५ कि़मी. लांब, २० मीटर रुंद आणि ४ मीटर उंच भिंत उभारण्याची नोंद निविदेत आहे. याशिवाय या परिसरात दोन पूल बांधण्यात येणार आहेत. त्यानंतर मेट्रो रेल्वेसाठी सुरक्षा भिंतीदरम्यान ट्रॅक टाकण्यात येईल. यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे (एमएडीसी) ‘एनएमआरसीएल’ला सुमारे ३७ हेक्टर जागा मिळाली आहे. बांधकामासाठी मार्किंग केली आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात आॅटोमोटिव्ह चौक ते खापरी आणि प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर असे दोन कॅरिडोर उभारण्यात येणार आहेत. या दोन्ही कॅरिडोरदरम्यान ३६ स्टेशन बनविण्यात येईल. या स्टेशनच्या मार्किंगसाठी शहराच्या विविध ठिकाणी दुभाजकावर साईन बोर्ड लावण्यात आले आहेत. मेट्रोचे स्टेशन कुठे राहील, हे लोकांना मार्किंगवरून कळणार आहे. (प्रतिनिधी)
मेट्रो रेल्वेची निविदा २० रोजी उघडणार
By admin | Updated: May 13, 2015 02:41 IST