कोट्यवधी हडपले : अनेकांची फसवणूक नागपूर : कमी किमतीत फ्लॅट देण्याची बतावणी करून शेकडो जणांचे कोट्यवधी रुपये हडप करणाऱ्या मेट्रिक्स इन्फ्रा कंपनीचा तपास आता गुन्हेशाखा करणार आहे. फसवणूक कोट्यवधींची असल्यामुळे हा तपास धंतोली पोलिसांकडून गुन्हेशाखेकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती आहे. कंपनीचा संचालक सुचित कुमार रामटेके आणि त्याच्या ११ साथीदारांनी वानाडोंगरी परिसरात रॉयल रेसिडेन्सी ही बहुमजली फ्लॅट स्कीम उभारण्याची पाच वर्षांपूर्वी जाहिरातबाजी केली होती. अल्प किमतीत स्वप्नातील घर मिळत असल्याची बतावणी केल्यामुळे रामटेके आणि त्याच्या साथीदारांच्या आमिषाला शेकडो नागरिक बळी पडले. कुणी तीन लाख तर कुणी त्यापेक्षा जास्त रक्कम त्याच्याकडे अॅडव्हान्स म्हणून दिली.मात्र, पाच वर्षे झाली तरी रामटेकेने दाखविलेल्या जागेवर इमारत उभी झाली नाही. प्रत्येक वेळी तो वेगळे कारण सांगून फ्लॅट बुक करणाऱ्यांना आल्यापावली परत पाठवित होता. मात्र, त्याने फसवणूक केल्याचे उघड झाल्यामुळे अनेक जण एकत्र आले. त्यांनी धंतोली पोलिसांना रामटेकेच्या फसवणुकीची माहिती दिली. चौकशीच्या नावाखाली अनेक दिवस पोलिसांनी त्यांना टोलविले. मात्र, १८ जुलैला नागरिकांचा रोष उफाळून आल्याचे पाहून धंतोली पोलिसांनी कैलास पाटील यांची तक्रार नोंदवून घेतली. त्याआधारे सूचित रामटेके, सुधाकर सोनपिंपळे, अमित राव, विजय वर्मा, गुणवंत गिरडकर, संजय चहांदे, अविनाश बारसागडे, महेश बावणे, शिल्पा इंगळे, राजेंद्र भागवत, सुमित अग्रवाल, अपेक्षा मेश्राम आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. मात्र, पोलिसांनी एकाही आरोपीला आजपर्यंत अटक का केली नाही, ते कळायला मार्ग नाही. फसवणूक झालेल्यांची संख्या आणि रक्कम कोट्यवधीत असल्याचे पाहून हा तपास गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
मेट्रिक्स इन्फ्राचा तपास गुन्हेशाखेकडे
By admin | Updated: August 8, 2015 03:10 IST