नागपूर : दोन दिवसापासून शहरातील पाऱ्यात थोडी वाढ दिसत आहे. रविवारीही कमाल तापमानात ०.६ अंशाची किंचित वाढ नोंदविण्यात आली. यामुळे रविवारचे तापमान ३१.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गोंदियातील तापमान १४.४ अंश म्हणजे विदर्भात सर्वात कमी होते.
वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतामध्ये शीतलहर सुरू झाली आहे, तर बंगालच्या खाडीमध्ये दाबाचा पट्टा तयार होत आहे. यामुळे दक्षिण भारतामधील काही राज्यात डिसेंबरच्या पूर्वी काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. पाऊस आणि शीतलहरीमुळे पुढील काही दिवसात मध्य भारतामध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे.
नागपुरात सकाळी चांगले ऊन पडले होते. गार वारेही वाहत होते. वातावरण स्वच्छ असून ढग निवळल्याने सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ६२ टक्के होती. सायंकाळी ५.३० वाजता ती ५३ टक्क्यांवर होती. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आर्द्रता असल्याने पारा घसरलेला नाही.