नागपूर : पालकमंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी नागपुरात लॉकडाऊन हटविण्याची घोषणा केल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये खुशीचे वातावरण आहे. लॉकडाऊन हटविल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रात्री ८ पर्यंत प्रतिष्ठान खुले राहिल्याने व्यवसाय वाढेल. त्यामुळे नागरिकांना खरेदी करण्यास सुविधा होईल. व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणेसाठी सरकार, प्रशासन आणि व्यापाऱ्यांसोबत उभे राहणाऱ्या लोकमतचे आभार मानले आहेत.
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी लोकमततर्फे वेळोवेळी व्यापारी हितार्थ प्रकाशित वृत्ताप्रति आभार व्यक्त केले. सरकार आणि प्रशासनाने आज लॉकडाऊन हटविण्याची केलेली घोषणा स्वागतायोग्य आहे.
चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अॅण्ड ट्रेडचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल म्हणाले, पालकमंत्र्यांचा लॉकडाऊन हटविण्याचा निर्णय स्वागतायोग्य आहे. कोविडच्या बचावासाठी लॉकडाऊन पर्याय ठरू शकत नाही. व्यापाऱ्यांनी व्यवसाय करताना मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे तसेच कर्मचारी आणि ग्राहकांनीही कोविड नियमांचे पालन करावे.
ऑल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे संचालक राजेश रोकडे यांनी व्यापारी आणि सामान्य नागरिकांना कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. त्यांनी प्रशासनाकडे बाजारात गर्दीवर नियंत्रण आणण्याची विनंती केली.
होलसेल क्लॉथ अॅण्ड यार्न मर्चंट्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष अजय कुमार मदान म्हणाले, व्यापारी रात्री ८ नंतर घरी परत जातील तेव्हा त्यांच्यावर कर्फ्यूच्या नावाखाली कुठलीही कारवाई करू नये. व्यापाऱ्यांनीही वेळेपूर्वीच दुकाने बंद करून घरी परतावे, असे आवाहन केले.