नागपूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवारी संत नगाजी महाराज मठ व सांस्कृतिक सभागृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष रवी बेलपत्रे होते. ज्येष्ठ पुंडलिकराव केळझरकर, प्रदेश उपाध्यक्ष विजय वाटकर, सरचिटणीस अरुण जमदाडे, कार्यकारी चिटणीस डॉ. संतोष मैदनकर, कार्याध्यक्ष सिद्राम रुद्राम, महिला प्रमुख डॉ. माधुरी पारपल्लीवार, विभागीय अध्यक्ष संतोष किनेकर, उपाध्यक्ष प्रकाश द्रव्येकर, समाज नेते सुरेश चौधरी उपस्थित होते. कोरोना काळात सरकारी यंत्रणेसोबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन सत्कार करण्यात आला. संघटन बळकट करण्याकरिता, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमावर चर्चा करून तालुकास्तरावरील संघटन बांधणीबाबत विचार व्यक्त करण्यात आले. दारोडकर चौकातील मेट्रो रेल्वे स्टेशनला संत नगाजी महाराज नाव देण्याच्या मागणीसाठी मेट्रो रेल्वे स्टेशन नामकरण कृती समितीचे संयोजक म्हणून सुरेश चौधरी यांची एकमताने निवड करण्यात आली.
सभेच्या बैठकीसाठी संत नगाजी महाराज सभागृह उपलब्ध करून दिल्याबाबत मठाचे अध्यक्ष बंडू राऊत व सचिव रमेश चौधरी यांचे आभार व्यक्त करण्यात आले. सभेचे आयोजन व प्रास्ताविक सतीश तलवारकर व संचालन अरुण जमदाडे यांनी केले. आभार विजय वाटकर यांनी मानले. बैठकीला सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्यासह निमंत्रित प्रतिनिधी उपस्थित होते.