नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ट्रॉमा केअर सेंटरमधील ‘अतिदक्षता विभाग-१’मधील ऑक्सिजन पुरवठा रविवारी पहाटे अचानक बंद झाल्याने एकामागे एक अशा तीन रुग्णांचा मृत्यूच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख व पालकमंत्री नितीन राऊत यांनी याची गंभीर दखल घेऊन तातडीन चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. मेडिकल प्रशासनाने चार सदस्यीय समिती स्थापन करून चौकशीला सुरुवात केली. सोबतच ऑक्सिजन गॅस प्लँटची थर्ड पार्टीकडून तपासणी करण्याचेही निर्देश दिले.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शिशू अतिदक्षता विभागातील १० चिमुकल्यांचे बळी जाण्याचे प्रकरण ताजे असताना मेडिकलच्या या घटनेने शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरचा ‘अतिदक्षता विभाग-१’मध्ये (आयसीयू) रविवारी पहाटे साधारण अर्ध्या तासासाठी ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला. यामुळे अर्ध्या-अर्ध्या तासाच्या कालावधीत तीन गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, नरेश मून (६३) रा. वॉर्ड क्र. १ महादुला यांचा पहाटे ६ वाजता, शिवरत्न शेंडे (५६) रा. सिद्धार्थनगर, कोरोडी यांचा ६.३० वाजता, तर अमोल नाहे (२४) रा. संग्रामपूर बुलडाणा यांचा ७ वाजता मृत्यू झाला. अचानक झालेल्या या मृत्यूने डॉक्टर व परिचारिकांमध्ये धावपळ उडाली. यात ऑक्सिजन पुरवठा बंद असल्याचे समोर आले. याची माहिती वरिष्ठ डॉक्टरांना देण्यात आली. तातडीने उपाययोजना केल्याने उर्वरित सहा रुग्णांचे प्राण वाचले. या धक्कादायक घटनेला ‘लोकमत’ने समोर आणताच खळबळ उडाली. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, पालकमंत्री नितीन राऊत, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार व वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्यराव लहाने यांनी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेत सखोल चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आज दिवसभरातील घडामोडींचा अहवाल सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करण्यासही सांगितले.
डॉ. सुशांत मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती
मेडिकल प्रशासनाने ‘लोकमत’ला दिलेल्या पत्रानुसार अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी आज ‘आयसीयू-१’ची पाहणी केली. यात त्यांना ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले नसल्याचे सांगितले. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पल्मनरीमेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली. यात सदस्य सचिव वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गांवडे, सदस्य म्हणून मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील व बधिरीकरण विभागाचे प्रमुख वासुदेव बारसागडे यांचा समावेश आहे. ट्रॉमा केअर सेंटरमधील ऑक्सिजन गॅस प्लँटची तपासणी थर्ड पार्टीकडून करण्याचा व अहवाल १२ तासांत देण्याचे आदेशही देण्यात आले.
- ५५ ते ६६ टक्के दरम्यान होते रुग्णांचे ऑक्सिजनचे प्रमाण
मेडिकलने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजन प्रमाण खूपच कमी होते. नरेश मून यांचे ५७ टक्के (रुम एअरवर), अमोल नाहे यांचे ६६ टक्के (हाय फ्लो ऑक्सिजनवर), तर शिवराम शेंडे यांचे ५५ टक्के (रुम एअरवर) ऑक्सिजन होते. रुग्णांची प्रकृती अतिगंभीर होती.
-निष्पक्ष चौकशी होणार का?
एखाद्या घटनेची चौकशी झाली आणि दोषींवर कारवाई झाली, अशी घटना मेडिकलच्या इतिहासात क्वचितच घडली आहे. यामुळे या घटनेची तरी निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे चौकशी समितीमध्ये मेडिकलच्याच डॉक्टरांचा समावेश आहे. यामुळे मेडिकलच्या बाहेरील सदस्यांकडून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही होत आहे.
रिपब्लिकन आघाडीकडून पालकमंत्र्यांना निवेदन
‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊन तीन रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाची दखल रिपब्लिकन आघाडीनेही घेतली. पालकमंत्री नितीन राऊत यांना निवेदन देऊन सखोल चौकशी करण्याची व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. शिष्टमंडळात दिनेश अंडरसहारे, संजय पाटील, सुनील जवादे, चरणदास पाटील व दीपक वालदे आदींचा समावेश होता.