नागपूर : पुणे-संत्रागाछी स्पेशल रेल्वेगाडीतील एका महिलेच्या दोन वर्षाच्या मुलीचे पोट अचानक दुखण्यास सुरुवात झाली. तिने याची सूचना गाडीतील कंडक्टरला दिली. त्याने त्वरित नियंत्रण कक्षाला सूचना दिली. संबंधित गाडीचा गोंदिया येथे थांबा नसताना रेल्वे प्रशासनाने तेथे ५ मिनिटे गाडी थांबवून संबंधित मुलीला वैद्यकीय मदत पुरवून प्रवाशांप्रति आपले कर्तव्य पार पाडले.किरण सिंह ही महिला रेल्वेगाडी क्रमांक ०२८२१ पुणे-संत्रागाछी एक्स्प्रेसने पुणे ते राऊरकेला असा प्रवास करीत होती. त्यांच्या दोन वर्षाच्या मुलीचे अचानक पोट दुखणे सुरू झाले. त्यांनी याची सूचना गाडीतील कंडक्टरला दिली. त्याने नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवरून याबाबत कळविले. विभागातील अधिकाऱ्यांनी त्वरित निर्णय घेऊन गोंदिया येथे या गाडीचा थांबा नसताना गाडी थांबविण्याचा निर्णय घेतला. गोंदिया रेल्वेस्थानकावर रेल्वेच्या डॉक्टरांनी या मुलीवर उपचार केले. त्यानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. दपूम रेल्वेने दाखविलेल्या समयसूचकतेबद्दल संबंधित मुलीच्या आईने रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात वैद्यकीय विभागाने विविध रेल्वेगाड्यातील ६४४ प्रवाशांना वैद्यकीय उपचार पुरविले. (प्रतिनिधी)
धावत्या रेल्वेगाडीतील मुलीला पुरविली वैद्यकीय मदत
By admin | Updated: October 27, 2016 02:30 IST