नागपूर : शहर पोलिसाच्या एनडीपीएस सेलने एमडी तस्करी करणाऱ्या टोळीतील चार जणांना अटक करून आरोपींकडून १०.२५ लाख रुपयाची २५६ ग्रॅम एमडी जप्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात एमडी जप्त करण्याची शहर पोलीस दलात पहिलीच घटना आहे.
अटकेतील आरोपींमध्ये फुलसिंह ऊर्फ सोनू सोहनसिंह पठ्ठी (३०) मां बम्लेश्वरीनगर, पिवळी नदी, प्रशांत विश्वराव सुटे (३०) रामबाग क्वाॅर्टर, मो. आसिफ रिसायत अली अन्सारी (३२) हबीबनगर, टेका आणि अजहर मजहर पटेल (२४) दूध डेअरी चौक, टेका नाका यांचा समावेश आहे. मुंबईचा आमीर खान आतिक खान, मो. आमीर मुकीम मलिक आणि यश पुनियानी फरार आहेत. आमीर खान आतिक खान मुंबईचा मोठा एमडी तस्कर आहे. आमीर खानला पूर्वीही नागपुरात एमडीसह पकडले होते. तो दीड वर्ष नागपूर कारागृहात होता. मार्च महिन्यात त्याची सुटका झाली. त्यानंतर तो मुंबईला गेला. तो आमीर मलिकसोबत एमडी तस्करी करू लागला. दोघेही नागपुरात लाखो रुपयांची एमडीची खेप पाठवीत होते. काही दिवसापासून मुंबईहून नियमित एमडीची तस्करी होत आहे. पोलिसांनी वेळोवेळी आरोपींना पकडले आहे. त्यांची नजर चुकवून आमीर खान कुरिअरने एमडीची खेप पाठवू लागला. आमीर खानने २५६ ग्रॅम एमडीचे कुरिअर नागपुरात पाठविले. त्याची माहिती पोलिसांना मिळाली. फुलसिंह ऊर्फ सोनू पठ्ठी एमडी विक्रीसाठी आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला एमडीची डिलिव्हरी देताना पकडले. आमीर खानने त्याला मो. आमीर मुकीम मलिकला १४० ग्रॅम, यश पुनियानीला ६० ग्रॅम आणि उर्वरित एमडी अन्य आरोपींना देण्यास सांगितले होते.
आमीर खानने सांगितल्यानुसार सोनू पठ्ठी एमडीची डिलिव्हरी देऊ लागला. त्याच्याकडून एमडी खरेदीसाठी पोहोचलेले प्रशांत सुटे, मो. आसिफ आणि अजहर पटेलला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २५६ ग्रॅम एमडी, मोबाईल, बाईकसह १३ लाख रुपयाचा माल ताब्यात घेतला. अजहर पटेलचा भाऊ सोहेल पटेलला एनडीपीएस सेलने काही दिवसापूर्वी मुंबईचा तस्कर दानिशसह अटक केली होती. त्याचे वडील जितू पटेल पोलिसाचा पंटर म्हणून सक्रिय आहे. दोन्ही मुले एमडी तस्करी लिप्त असणे ही गंभीर बाब आहे. कारवाईदरम्यान मो. आमीर मलिक फरार झाला.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर आयुक्त सुनील फुलारी, डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय सार्थक नेहेते, एपीआय बयाजीराव कुरले, सूरज सुरोशे, हवालदार प्रदीप पवार, राजेश देशमुख, समाधान गीते, नामदेव टेकाम, नितीन मिश्रा, शिपाई कपिल तांडेकर, अश्विन मांगे, समीर शेख, नितीन साळुंखे, राहुल पाटील, पूनम रामटेके, रुबीना शेख यांनी केली.
चित्र :