नागपूर : जिल्ह्यात वर्ग ९ व १० चे वर्ग सुरू झाले आहे. ४ तासांच्या शाळेत गणित, विज्ञान व इंग्रजी हे विषय प्रामुख्याने शिकविण्यात येत आहेत. पण अनेक शाळांमध्ये याच विषयांचे शिक्षक नसल्याने, अशा शाळेचे विद्यार्थी गणित, विज्ञान, इंग्रजी विषयाच्या अध्ययनापासून वंचित राहत आहे. नागपूर जिल्ह्यात गणित आणि विज्ञान विषयाच्या ६० जागा रिक्त आहेत. तर दुसरीकडे १४० शिक्षक अतिरिक्त असून, त्यांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागपूर जिल्ह्यात ५९८ अनुदानित, ७ नगर परिषद व १६ जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा आहेत. जिल्ह्यात गणित आणि विज्ञान विषयाच्या ६० जागा रिक्त असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. दुसरीकडे गेल्यावर्षी अतिरिक्त असलेल्या शिक्षकांची संख्या १५० च्या जवळपास आहे. वर्ग ९ आणि १० साठी महत्त्वाचे असलेले गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांचे शिक्षक उपलब्ध नसतील तर विद्यार्थी कसे शिकणार, हा प्रश्नच आहे. शासनाने शिक्षकांची भरती बंद केली आहे. २०१२ नंतर अनुदानित शाळांमध्ये संस्थाचालकांनी विषय शिक्षकांच्या नावावर इतर विषयाचे शिक्षकांची नियुक्ती पैसे घेऊन करवून घेतली आहे. गणित विषयाला शिकवायला आवश्यक असलेली गुणवत्ता त्या शिक्षकांमध्ये नाही. अनेक शाळेतील गणित आणि विज्ञानाचे शिक्षक निवृत्त झाले आहे. माध्यमिक शिक्षण विभागाकडे असलेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या यादीत गणित आणि विज्ञान विषयाचे शिक्षकच नाही. अतिरिक्त असलेल्या दुसऱ्या विषयांच्या शिक्षकांची हे विषय शिकविण्याची क्षमता नाही. इतर दुसरे पर्याय शिक्षण विभागाकडून उपलब्ध केले जात नाही. पवित्र पोर्टची भरतीची प्रक्रिया थांबविलेली आहे. त्यामुळे खऱ्या विषयाच्या अध्यापनाची गरज असतानाही विद्यार्थी वंचित आहे.
- एक शिक्षक घेतोय ८ वर्ग
जिल्ह्यातील एका शाळेत वर्ग ९ व १० चे प्रत्येकी दोन वर्ग आहे. या शाळेत दोन गणित शिक्षकांच्या जागा मंजूर आहे. सेवानिवृत्त झाल्याने एकच गणिताचा शिक्षक आहे. कोरोनामुळे शाळा सुरू झाल्याने सोशल डिस्टेंसिंग रहावी म्हणून एका वर्गाचे दोन वर्ग तयार केले आहे. त्यामुळे एका गणिताच्या शिक्षकाला ४ तास ८ वर्ग सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे.
- गणित आणि विज्ञान विषयाचे शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक उपलब्ध नाही. शिक्षण विभागात विचारणा केली असता, सदर विषयाचे शिक्षक अतिरिक्त नसल्याने आम्ही पाठवू शकत नाही, अशी उत्तरे मिळतात. त्यामळे शिक्षकांच्या नियुक्तीसाठी संस्थेला परवानगी द्यावी अन्यथा पवित्र पोर्टलमार्फत नेमणुक करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
भारत रेहपाडे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती
- गणित, इंग्रजी, विज्ञान हे महत्वाचे विषय आहे. शिक्षकांशिवाय विद्यार्थ्यांना समजणे अवघड आहे. अनुदानित आणि सरकारी शाळांपुढे या विषयांची समस्या गंभीर आहे. त्यासाठी नागपूर बोर्ड किंवा शिक्षण उपसंचालक कार्यालयाने बेरोजगार शिक्षकांची नोंदणी करून, ज्या शाळेत शिक्षकांच्या जागा रिक्त आहे. तिथे मानधनावर नेमणुक करण्याचे धोरण ठरवावे.
आशिष लाखे, शिक्षक