नागपूर : अंबाझरी जैवविविधता उद्यानाला बुधवारी भीषण आग लागली. विद्यापीठाच्या बाजूने दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही आग लागल्याचे निदर्शनात आले. ही आग वाळलेल्या गवतामुळे वेगाने पसरल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या आगीने सुमारे १०० हेक्टरच्या वर परिसर कवेत घेतल्याची माहिती उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्ल यांनी दिली. गवतामध्ये कागद तसेच पाॅलिथीनचे तुकडे असतात. पेट घेतल्यावर हे तुकडे उडून इतरत्र पडतात. त्यामुळेही आग पसरली असे शुक्ल यांनी सांगितले.
सुमारे ७५० हेक्टर परिसरातील या संरक्षित जंगलाचे व्यवस्थापन संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे देण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी तयार झालेल्या या जैवविविधता उद्यानामुळे शहरालगत निसर्गभ्रमणाची संधी नागपूरकरांना उपलब्ध झाली आहे. इतर आवश्यक सुविधांसह सायकल राइड आणि ई-वाहनातून सफारीचीही सुविधा या उद्यानात आहे. छायाचित्रण आणि पक्षिनिरीक्षणासाठीही अनेक निसर्गप्रेमी या उद्यानात येतात. आग विझवण्यासाठी महापालिका अग्निशमन दलाचे ५ तसेच एमआयडीसी व वाडी नगर परिषदेचा प्रत्येकी १ असे सात बंब घटनास्थळी दाखल झाले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभाग तसेच अग्निशमन दलाचे जवान व कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सध्या उद्यानातील प्राणी आगीमुळे दगावल्याची माहिती नाही. मात्र या उद्यानात माेठ्या प्रमाणात पक्ष्यांचा अधिवास असून, ते या आगीमुळे सर्वाधिक प्रभावित झाल्याचे म्हटले जात आहे.