नागपूर : इंटर माॅडेल स्टेशनच्या नावाखाली अजनीवन व आसपासच्या परिसरातील ३०,००० च्यावर झाडे कापली जाणार आहेत. पहिल्यांदाच एखाद्या प्रकल्पासाठी एवढ्या माेठ्या प्रमाणात झाडांची कत्तल हाेत आहे आणि ती राेखण्यासाठी वृक्षप्रेमी सरसावले आहेत. मानवाकडून काही मागण्याऐवजी केवळ देत राहणाऱ्या झाडांप्रती आपलेही काही संविधानिक कर्तव्य आहे, ही जाणीव करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विशाल सायकल रॅली काढली. १००० च्यावर सायकलस्वार आणि माेठ्या प्रमाणात नागरिक स्वयंस्फूर्तीने या रॅलीमध्ये सहभागी झाले. वृक्षसंवर्धन हे एक ध्येय ठेवून एका रंगात रंगलेल्या या वृक्षप्रेमींनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा(एनएचएआय)द्वारे हाेणाऱ्या वृक्षताेडीचा निषेध करीत अजनीवन वाचविण्याचा संदेश दिला.
प्रजासत्ताक दिनाची पहाट हाेत असताना एकेक करीत शेकडाे पर्यावरणप्रेमी संविधान चाैकात गाेळा झाले. येथे राष्ट्रगीत गाऊन मानवंदना देण्यात आली. अजनीवनामधील प्रस्तावित वृक्षताेडीचे रहस्य प्रकाशात आणणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आशिष घाेष व या प्रकरणात जनहित याचिका दाखल केलेले शरद पालीवाल यांनी फ्लॅग ऑफ करून रॅलीला रवाना केले. आणखी एक ज्येष्ठ शरद भावे यांनी या सायकल रॅलीचे नेतृत्व केले. एक किमीपर्यंत लांब असलेली सायकलस्वारांची रॅली सिव्हिल लाईन्स, धरमपेठ, शंकरनगर, बजाजनगर, लक्ष्मीनगर, रहाटे काॅलनी असा १२ किमीचा प्रवास करून अजनी येथील रेल्वे मेन्स शाळेत समाराेप झाला. संविधानाच्या आर्टिकल ५१(ए)अंतर्गत नैसर्गिक पर्यावरण जाेपासणे या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. आयएमएसच्या नावाने ३० हजाराच्यावर झाडांची वृक्षताेड करून माेठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी केली जात आहे. त्यामुळे आपले कर्तव्य म्हणून प्रत्येक नागरिकाने याविराेधात उभे राहण्याची गरज आहे, अशी भावना रॅलीचे संयाेजक विशाल माैर्य यांनी व्यक्त केली. रायजिंग स्टार बॅन्डद्वारे देशभक्ती गीतांच्या सादरीकरणाने या आंदाेलनाचा समाराेप झाला.
एक रंग, एक ध्येय
ताेडली जाणारी झाडे वाचविणे व पर्यावरणाचे रक्षण करणे हे एकच ध्येय घेऊन शेकडाे सायकलस्वार रॅलीत सहभागी झाले. सेव्ह अजनीवन असा संदेश असलेली पिवळ्या रंगाचे टी-शर्ट परिधान केलेले सायकलस्वार एका सूत्रात असल्यासारखे दिसत हाेते. अनेकांच्या हातात तिरंगा हाेता. देशभक्तीची भावना जागवत अजनीवन वाचविण्याचे आवाहन रॅलीतून देण्यात आले.
भंडारा, अमरावतीतही सेव्ह अजनीवन
केवळ नागपूरच नाही तर पर्यावरणप्रेमींनी भंडारा आणि अमरावतीतही अजनीवन वाचविण्याचा संदेश देत सायकल रॅली काढली. हे चित्र वृक्षताेड करणारे व त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या लाेकांना चपराक हाेती. भंडाऱ्यात वृक्षमित्र सायकलस्वारांनी मुख्य मार्गावरून सायकल रॅली काढत नागपुरात सुरू असलेल्या आंदाेलनाला पाठिंबा दर्शविला आणि वृक्षताेड करणाऱ्यांचा निषेध केला. अमरावतीतही मुख्य मार्गावरून २० किमीपर्यंत सायकल रॅली काढून नागपुरातील अजनीवन वाचविण्याचा संदेश देण्यात आला.