नागपूर : शाळेतून घरी जात असताना एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. दहा दिवसापूर्वी घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्याने हे प्रकरण उघडकीस आले. १५ मार्च रोजी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या घरी जात होती. तिला धनराज टेंभूर्णे व राकेश ऊर्फ बंटी गणवीर यांनी घरी सोडून देण्याचा बहाना करून मोटारसायकलवर बसविले. एकांत स्थळी नेऊन, तिला कोलड्रींक मधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर या दोघांसह अन्य तिघांनी तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने अत्याचाराची घटना घरच्यांना सांगितली. जरीपटका पोलिसांतही तक्रार करण्यात आली. मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला. त्यामुळे आरोपींची हिंमत वाढली, त्यांनी तिच्या घरच्यांवर चूप राहण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घरच्यांनी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना घटनेची माहिती दिली. युवा सेनेचे नितीन तिवारी यांच्यासह पीडित मुलीच्या घरच्यांनी प्रकरणाची तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली. दरम्यान आयुक्तांनी लगेच सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग, अप्पर आयुक्त श्रीकांत तरवडे व गुन्हे शाखेच्या सामाजिक विभागाच्या माध्यमातून तपास करण्याचे निर्देश दिले. एपीआय जयपूरकर यांनी बालिकेची विचारपूस करून आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे. युवा सेनेने याप्रकरणी पोलिसांकडून करण्यात आलेल्या दुर्लक्षामुळे जरीपटका ठाण्याचे निरीक्षक खोब्रागडे यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. शिष्टमंडळात युवासेनेचे जयसिंह भोसले, मंगेश ठाकरे, आरीफ पटेल, संदीप पटेल, अक्षय मेश्राम, प्रीतम कापसे, नीलेश तिघरे सहभागी होते. (प्रतिनिधी)
अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार
By admin | Updated: March 26, 2015 02:34 IST