कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश बोहरी यांचे प्रतिपादननागपूर : वैवाहिक आणि कौटुंबिक वाद हे सामोपचार व आपसी सहमतीने सोडवण्यासाठी मध्यस्थी व्यवस्था हे माध्यमच प्रभावी असून पक्षकारांनी आपले वाद सोडवण्यासाठी याच माध्यमाचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आय. एम. बोहरी यांनी येथे केले. कौटुंबिक न्यायालय परिसरात मध्यस्थी केंद्र आणि जिल्हा बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी बोहरी हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मध्यस्थी प्रक्रियेची सर्वात अधिक गरज कौटुंबिक न्यायालयाला आहे. वैवाहिक वाद निर्माण झाला की, न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात भादंविच्या ४९८ अ, कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण, कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट, खावटी, मुलांचा ताबा, अशी प्रकरणे एकाच वेळी सुरू होतात. त्यामुळे पती-पत्नीशिवाय संपूर्ण कुटुंबच प्रभावित होते. यावर मध्यस्थी हाच एकमेव तोडगा आहे. कौटुंबिक विवाद हे परस्पर नात्यांवर अवलंबून असतात. अतिशय संवेदनशीलपणे ते हाताळावे लागतात. त्यामुळे सर्वांनीच समन्वय साधण्याचे काम करावे, जेणेकरून पक्षकारांना योग्य लाभ मिळेल. कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थी केंद्र भरीव कार्य करीत असून, उत्तरोत्तर प्रगती होत असल्याचेही ते म्हणाले. मनाप्रमाणे न्याय मिळवता येतोया कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी जिल्हा न्यायालयाच्या सहायक सत्र न्यायाधीश श्रीमती ए. सी. राऊत या मध्यस्थी प्रक्रियेत सहभागी न्यायाधीश, वकील, पक्षकार आणि मध्यस्थ या विषयावर बोलताना म्हणाल्या की, न्यायालयात प्रकरण दाखल होताच पक्षकारांमध्ये आरोप-प्रत्यारोप वाढण्यापूर्वीच प्रकरणे मध्यस्थी केंद्राकडे पाठविले तर तडजोड होण्याची शक्यता अधिक असते. न्यायालयात खटला चालून निकाल आपल्याच बाजूने लागेल, याबाबत अनिश्चितता असते. मध्यस्थी प्रक्रियेत मात्र स्वत:च्या मनाप्रमाणे जलदगतीने न्याय मिळवता येतो. कितीही वेळा प्रकरण मध्यस्थी प्रक्रियेसाठी पाठविता येते. अन् मध्यस्थीची निर्माण झाली गरजमध्यस्थी केंद्राचा मूळ गाभा, त्याची गरज आणि फायदे यावर बोलताना मध्यस्थ अॅड. ज्योती धर्माधिकारी म्हणाल्या की, कायद्याचा गैरवापर होऊन कुटुंबव्यवस्था मोडकळीस येऊ लागली होती. त्यावेळी मध्यस्थीची खरी गरज निर्माण झाली. या कार्यक्रमात व्यासपीठावर कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश आणि मध्यस्थी केंद्राचे समन्वयक सुभाष काफरे, प्रशिक्षित मध्यस्थ अॅड. राजेंद्र राठी, जिल्हा बार असोसिएशनचे सचिव अॅड. नितीन तेलगोटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अॅड. एस. ए. दावडा तर आभारप्रदर्शन वकील संघाचे सहसचिव अॅड. श्रीकांत गौरकर यांनी केले. पक्षकार पायल जांगडे आणि प्रशिक्षित मध्यस्थ अॅड. स्मिता देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रभावी लघुनाटिका पत्नीच्या आईमुळे पती-पत्नीमध्ये निर्माण झालेला टोकाचा वाद मध्यस्थी प्रक्रियेद्वारे कसा संपुष्टात येऊ शकतो, यावर अत्यंत प्रभावीपणे एक लघुनाटिका सादर करून उपस्थितांना स्तब्ध करण्यात आले. या नाटिकेत खुद्द न्यायाधीश सुभाष काफरे यांनी न्यायाधीशाची भूमिका वठविली. मध्यस्थाची भूमिका शर्मिला चरलवार, पतीची भूमिका अॅड. नितीन रूडे, पत्नीची भूमिका अॅड. दर्शना गांधी, आईची भूमिका विवाह समुपदेशक श्रीमती एस. पी. लानकर यांनी अत्यंत प्रभावीपणे वठविली. अॅड. भारत टेकाम, अॅड. अमृता घोंगे यांनी वकिलांची भूमिका वठविली. या नाटिकेचे सूत्रसंचालन अॅड. राजेंद्र राठी यांनी केले.(प्रतिनिधी)
मध्यस्थीतूनच सुटतील वैवाहिक वाद
By admin | Updated: July 5, 2015 02:58 IST