होसबळेंवर चर्चा : संघ पदाधिकाऱ्यांचा बोलण्यास नकार नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोर कमिटीच्या बैठकीत १३ मार्च रोजी सुरू होत असलेल्या प्रतिनिधी सभेच्या अजेंड्यावर मंथन झाले. यासंदर्भात संघाचे पदाधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत. मात्र सूत्रांच्या मते बैठकीत दत्तात्रय होसबळे यांना संघाचे दुसऱ्या क्रमांकाचे संघकार्यवाह बनविण्यावर चर्चा झाली.नागपुरात दर तिसऱ्या वर्षी होणाऱ्या प्रतिनिधी सभेत संघकार्यवाहची निवडणूक होते; नंतर संघकार्यवाह उर्वरित कार्यकारिणीची निवड करतात. या वेळी अशी चर्चा आहे की, संघकार्यवाह भय्याजी जोशी यांना भाजपा व संघात समन्वयाची जबाबदारी देऊन दिल्ली येथे पाठविले जाऊ शकते. सध्या सहसंघकार्यवाहची जबाबदारी सांभाळत असलेले दत्तात्रय होसबळे यांना जोशी यांची जागा दिली जाऊ शकते. जोशींनीदेखील परिवर्तन आवश्यक असल्याचे सांगून याचे संकेत दिले होते. सूत्रांच्या मते, संघाच्या कोर कमिटीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत, संघकार्यवाह भय्याजी जोशी, दत्तात्रय होसबळे व वेणुगोपाल यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. सूत्रांच्या मते, बैठकीत संघात फेरबदल करण्याबाबत कुठलाही निर्णय होऊ शकला नाही. होसबळे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याशी जवळीक असल्यामुळे जोशी यांनाच कायम ठेवले जावे, असे संघाच्या एका गटाचे म्हणणे आहे. आजच्या बैठकीत प्रतिनिधी सभेत कोणकोणते विषय येतील, हे मात्र निश्चित झाले. कोर कमिटीच्या बैठकीनंतर आता प्रतिनिधी सभेपूर्वी प्रांत व क्षेत्रीय स्तरावरील बैठका होतील. या बैठकांमध्ये सभेचा अंतिम अजेंडा निश्चित होईल. घर वापसी, गोहत्या, काश्मीर समस्या या चर्चेसोबतच चिनी वस्तूंच्या विरोधात रणनीती आखण्यावर सभेत विचारमंथन होण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी) १४ भागांना दिली जबाबदारीसंघाच्या प्रतिनिधी सभेसाठी तयारीला वेग देताना महानगरातील १४ भागांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. संघाच्या महानगर शाखेला सभेची जबाबदारी सोपविण्यात आली. निवास, अल्पोपहार, स्वागत, वाहतूक, स्वच्छता आदी जबाबदारी विविध भागांना सोपविण्यात आली आहे.
संघाच्या कोर कमिटीत प्रतिनिधी सभेवर मंथन
By admin | Updated: March 10, 2015 02:27 IST