नागपूर : नागपूर शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवल्या गेला आहे. देशभरातील टॉप १५ ‘इमर्जिंग स्मार्ट सिटी’मध्ये नागपूर शहराची निवड करण्यात आली आहे. दिल्ली येथील स्मार्ट सिटी फाऊंडेशनतर्फे मंगळवारी नागपूर महापालिकेला ‘स्मार्ट सिटी’ सन्मान प्रदान करण्यात आला. दिल्ली येथे आयोजित दोन दिवसीय ‘फर्स्ट स्मार्ट सिटी कौन्सिल’मध्ये मंगळवारी स्मार्ट सिटी फाऊंडेशनच्या इंडियन चाप्टरचे संचालक फिलिप बॅन यांच्या हस्ते आ. अनिल सोले, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांनी हा सन्मान स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्मार्ट सिटी’ची संकल्पना मांडली. या संकल्पनेवर जगभरातील विविध देशांत अमेरिकेतील ‘स्मार्ट सिटी फाऊंडेशन’ नावाच्या ग्रुपने काम केले आहे. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर अमेरिकेच्या या चमूने भारतातील शहरांचे सर्वेक्षण केले. सोशल, इकॉनॉमिक, एज्युकेशन व इन्व्हायरमेंट क्षेत्रात लोकसहभागातून केलेल्या कामांच्या आधारावर शहरांचे गुणांकन केले. संबंधित शहरांचे झपाट्याने होत असलेले शहरीकरण, उपलब्ध नागरी सुविधा, रेल्वे, रोड व हवाई नेटवर्क, गुंतवणुकीच्या संधी आदी मुद्यांवर शहरांचे परीक्षण करण्यात आले. यातून १५ शहरांची ‘स्मार्ट सिटी’ म्हणून निवड करण्यात आली. या १५ शहरांमध्ये नागपूर शहराला स्थान मिळाले आहे. महाराष्ट्रात नागपूरसह कल्याण, डोंबिवली व पिंपरी, चिंचवड या शहरांचाही यात समावेश आहे. ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत नागपूर शहराची निवड झाल्याने या आधारावर देशपातळीवर नागपूरचे मार्केटिंग करणे सोपे जाईल. या शहरात गुंतवणुकीसाठी संधी आहे हे देशाला कळेल व उद्योजक, बिल्डर्स येथे गुंतवणुकीसाठी आकर्षित होतील. (प्रतिनिधी)
मनपाला ‘स्मार्ट सिटी’ सन्मान
By admin | Updated: February 18, 2015 02:45 IST