लोकमत न्यूज नेटवर्क
कूचबिहार - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आटोपला असून, अखेरच्या पाच टप्प्यांमध्ये अनेक मतदारसंघ मुस्लिमबहुल आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुस्लिम मतदारांना एकजूट होण्याबाबत केलेल्या आवाहनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. तृणमूल कॉंग्रेसला मत विभाजित होण्याची भीती वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी असे आवाहन केले आहे. मात्र, अशी भूमिका घेऊन तृणमूलने पराभव स्वीकारला असून, हा त्यांच्यासाठी ‘सेल्फ गोल' ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले. प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते.
जर भाजपने सर्व हिंदूंना एकजूट होण्याचे आवाहन केले असते, तर आतापर्यंत निवडणूक आयोगाकडून आठ ते दहा नोटीस प्राप्त झाल्या असत्या. फुटबॉलच्या मैदानातील ‘सेल्फ गोल' मोठे नुकसान करतो. निवडणुकीच्या रिंगणातदेखील तृणमूलसोबत असेच झाले आहे, असे मोदी यांनी प्रतिपादन केले.
ममतांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप लागत असलेल्या टेपवरदेखील मोदी यांनी भाष्य केले. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्र्यांनी भाईपो सर्व्हिस टॅक्स सुरू केला. गरिबांनी जोडलेला एक-एक रुपया त्या टॅक्समध्ये गेला. १० वर्षांच्या सत्ताकाळात तृणमूलच्या नेत्यांनी बंगालला अक्षरशः ओरबाडले. वंचित, आदिवासी, चहाच्या मळ्यांमधील मजुरांसोबत अन्याय होत गेला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती, असा आरोप मोदींनी केला.