नागपूर : आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते मा. मा. येवले यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त डाॅ. आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथील सभागृहात त्यांचा हृद्य सत्कार तसेच त्यांच्यावरील ‘रिपब्लिकन झंझावात : मा.मा. येवले’ या चरित्रग्रंथाचे विमाेचन करण्यात आले. यावेळी आरपीआय नेते दादासाहेब गवई यांच्या पत्नी डाॅ. कमलताई गवई यांनी मामांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. मामाचे लग्न करावे म्हणून आम्ही प्रयत्न चालविले हाेते. एका डाॅक्टर मुलीशी परिचयही करून दिला. मात्र आपल्या लग्नासाठी हा खटाटाेप चालल्याचे कळताच मामा प्रचंड चिडले आणि माझ्याशी खूप भांडले. रिपब्लिकन पक्ष, समाज व चळवळीसाठी आजीवन लग्न न करण्याची भूमिका घेतल्याची आठवण कमलताई यांनी सांगितली.
काॅलेजच्या कुंभारे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदन्त नागार्जुन सुरई ससाई, आमदार प्रा. जाेगेंद्र कवाडे, समितीचे सचिव डाॅ. सुधीर फुलझेले, हरिदास टेंभुर्णे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. मेहरे, विलास गजघाटे प्रामुख्याने उपस्थित हाेते. डाॅ. कमलताई यांनी पुढे, आजारी असताना सभेला हजर राहणे, खाेलीला आग लागली तेव्हा झाेपलेल्या मामांना ओढून काढण्याचा प्रसंग व दादासाहेबांवर जीवघेणा हल्ला झाला तेव्हा मामांची तळमळ, अशा विविध आठवणींना उजाळा दिला. प्रा. जाेगेंद्र कवाडे यांनीही चळवळीसाठी मामांनी केलेल्या कार्याच्या आठवणी उलगडल्या. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्यायावर आधारित आंबेडकरी तत्त्वज्ञान हे वैश्विक तत्त्वज्ञान आहे. ते आहे तसे साधे पण त्यावर चालणे अग्निदिव्यावर चालण्यासारखे आहे. म्हणूनच आंबेडकरी चळवळीत काम करणे ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. अशा कर्मठ लाेकांमध्ये मामा येवले या भीमसैनिकाचा उल्लेख येताे. त्यांनी संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीसाठी वाहिले. भारत बाैद्धमय करण्याच्या बाबासाहेबांच्या संकल्पाच्या सिद्धीसाठी मामांनी संपूर्ण मराठवाड्यात धम्म परिषदा घेतल्या. आज कार्यकर्ते श्रीमंत आहेत पण चळवळ गरीब आहे. पूर्वी कार्यकर्ते गरीब हाेते पण चळवळ श्रीमंत हाेती. ती केवळ मामांसारख्या भीमसैनिकांमुळेच. नवीन पिढीला त्यांचे कार्य माहिती व्हावे, अशी भावना प्रा. कवाडे यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक मामांवरील चरित्रग्रंथाचे लेखक रविचंद्र हडसनकर यांनी केले तर संचालन एन. आर. सुटे यांनी केले.