नागपूर : शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पूरक व पाठपुरावा करणारी यंत्रणा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजना नागपूर जिल्ह्यामध्ये राबविण्याचे संकेत ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले.
शासनाच्या विविध योजना व त्याची अंमलबजावणी यासाठी नागपूर जिल्हा अग्रेसर राहावा. सामाजिक न्याय, कौशल्य विकास, कृषी, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रातील वेगवेगळ्या योजनांची १०० टक्के अंमलबजावणी नागपूर जिल्ह्यामध्ये व्हावी, यासाठी एक खिडकी स्वरूपाची नवीन योजना पालकमंत्री नितीन राऊत यांच्या पुढाकाराने तयार होत आहे. या योजनेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजना, असे नाव देण्यात आले आहे.
विभागीय कार्यालयामध्ये सोमवारी यासंदर्भात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार अभिजित वंजारी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.