नागपूर : सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील मुख्य आरोपी राजू भेदे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान, अटकेतील दोन आरोपींना आज कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठविले असून, सोनेगाव पोलीस शनिवारी कोर्टात त्यांच्या पीसीआरची मागणी करणार आहेत.राजनांदगाव (छत्तीसगड) जिल्ह्यातील मूळ निवासी असलेल्या ५५ वर्षांच्या विधवा महिलेला बेदम मारहाण करून तीन नराधमांनी तिच्यावर बुधवारी रात्रभर पाशवी अत्याचार केला होता. तिच्यासोबत असलेल्या हरी म्हात्रे नामक व्यक्तीलाही मारहाण करून पळवून लावले. गुरुवारी दुपारी शेजारच्या महिलांनी मदत करून तिला पोलीस ठाण्यात पोहोचविले. महिला समितीच्या अर्चना भोयर आणि त्यांच्या सहकारी महिलांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर सोनेगाव पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, दिवसभराचा वेळ मिळाल्यामुळे आरोपी राजू भेदे फरार झाला. तो या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्यानेच प्रारंभी पीडित महिलेचे तोंड दाबून तिला मारले होते. आरोपी सुनील गायकवाड आणि राम गायकवाड या दोघांना पोलिसांनी अटक केली. पीएसआय निशा बनसोड यांनी आज या दोघांना कोर्टात हजर करून पीसीआरची मागणी केली. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे कोर्टाने आज या दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठविले. शनिवारी पुन्हा या दोघांचा पीसीआर मिळावा म्हणून पोलीस प्रयत्न करणार आहेत. या तीनही आरोपींचा गुन्हेगारी अहवाल पोलीस गोळा करीत आहेत. ते घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. (प्रतिनिधी)
सामूहिक बलात्कारातील मुख्य आरोपी फरार
By admin | Updated: December 6, 2014 02:48 IST