एमआयडीसीचा २१२ हेक्टरने विस्तार : उद्योग विभागातर्फे अधिसूचना जारीनागपूर : काटोल एमआयडीसीचा २१२.१० हेक्टरने विस्तार होणार आहे. या संबंधीची अधिसूचना राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने जारी केली आहे. विस्तारित एमआयडीसीचा ‘आॅटो कंपोनंट हब’ म्हणून विकसित करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. प्राप्त माहितीनुसार महिंद्रा अॅण्ड महिंद्राने येथे ‘व्हेंडर डेव्हलपमेंट पार्क’ उभारण्याची तयारी चालविली आहे. काटोल एमआयडीसीचा विस्तार करून तिचा ‘आॅटो कंपोनंट हब’ करण्याची मागणी आ. आशिष देशमुख यांनी राज्य सरकारकडे केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यासाठी पुढाकार घेतला व राज्य सरकारने काटोल एमआयडीच्या विस्ताराची अधीसूचना जारी केली. काटोल तालुक्यातील मौजा गोन्ही येथील ११.६२ हेक्टर, मौजा येनवा येथील ९२.२७ हेक्टर, मौजा सालई येथील ४८.९५ हेक्टर, मौजा कारला येथील ५९.२६ हेक्टर अशा एकूण २१२.१० हेक्टर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. आता जिल्हाधिकारी अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू करतील. राज्य सरकारच्या नव्या अधिग्रहण परिपत्रकानुसार थेट शेतकऱ्यांशी वाटाघाटी होऊन मोबदला दिला जाईल.महिंद्र अॅण्ड महिंद्राचा हिंगणा येथे ट्रॅक्टर निर्मिती कारखाना आहे. या प्लांटसाठी महिंद्रला दरवर्षी २८०० कोटी रुपयांचे स्पेअर पार्ट व कम्पोनंट परराज्यातून आणावे लागतात. त्यामुळे हे सर्व पार्ट नागपूर जिल्ह्यातच बनविण्याचा महिंद्राचा विचार आहे. काटोल एमआयडीसीच्या विस्तारीत जागेत हा प्रकल्प उभारण्याचा महिंद्राचा विचार आहे. त्यासाठी सरकारशी चर्चा सुरू असून चर्चा अंतिम टप्प्यात आहे. सरकारकडूनही जागा देण्याबाबत सकारात्मक संकेत आहेत. महिंद्राच्या सर्वेक्षण चमूने जागेची पाहणीही केली आहे. याशिवाय या विस्तारित एमआयडीची ‘आॅटो कम्पोनंट हब’ म्हणून विकास केल्यास भोपाळ येथील आयशर ट्रॅक्टर, इंदूर येथील जॉन डियर व जहिराबाद येथे महिंद्राच्या ट्रॅक्टर निर्मिती कारखान्यांना लागणारे पार्ट येथे तयार होतील.
काटोलमध्ये महिंद्राचा व्हेंडर डेव्हलपमेंट पार्क
By admin | Updated: November 28, 2015 03:29 IST