कामठी : कामठी तालुक्यात चार ग्राम पंचायतची धूरा महिला सरपंचाकडे आली आहे. तालुक्यातील खेडी ग्रामपंचायतचे सरपंच पद हे अनुसूचित जमाती (महिला) संवर्गाकरिता राखीव आहे. खेडी ग्रा.पं.च्या ९ जागांसाठी जानेवारीत निवडणूक झाली. तीत भाजपा समर्थीत आदर्श ग्राम विकास पॅनेलने ८ जागेवर विजय मिळवित एक हाती सत्ता मिळवली होती. त्यामुळे अनुसूचित जमाती संवर्गातून विजयी झालेल्या एकमेव सदस्य भारती गिरधर देवगडे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
घोरपड ग्रामपंचायतचे सरपंचपद इतर मागास वर्ग (महिला) संवर्गाकरिता राखीव आहे. नऊ सदस्य संख्या असलेल्या घोरपड ग्रामपंचायतमध्ये भाजप समर्थीत आदर्श ग्राम विकास पॅनेलने नऊही जागेवर विजय मिळवित सत्ता मिळवली. येथे सरपंचपदी तारा बलवंत कडू तर उपसरपंचपदीअनिकेत अशोक वानखेडे बिनविरोध निवड झाली. घोरपड ग्रामपंचायत मध्ये गत १० वर्षापासून काँग्रेस समर्थित गटाचे वर्चस्व होते. यावेळी भाजप समर्थीत पॅनेलला सत्तापरिवर्तन करण्यात यश आले. पवनगाव ग्रामपंचायत सरपंचपद हे सर्वसाधारण महिला संवर्गा करिता राखीव आहे. नऊ सदस्य संख्या असलेल्या पवनगाव-धारगाव गट ग्रामपंचायत निवडणुकीत कामठी तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष किरण राऊत यांच्या नेतृत्वात ९ जागावर भाजपा समर्थीत पॅनेलचा विजय झाला. सरपंचपदी त्यांच्या पत्नी नेहा किरण राऊत तर उपसरपंचपदी रामचंद्र मंगल रेवाडे निवड झाली. भामेवाडा ग्रामपंचायतचे सरपंचपद इतर मागासवर्ग (महिला) संवर्गाकरिता राखीव आहे. या ग्रामपंचायत मध्ये सात सदस्यांकरिता निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजप समर्थीत आदर्श ग्राम विकास पॅनेलचा पाच जागेवर तर काँग्रेस समर्थीत पॅनेलचा दोन जागेवर विजय झाला होता. येथे सरपंचपदी भाजपा समर्थीत पॅनेलच्या सविता विनोद फुकट तर उपसरपंचपदी रतन पुंडलिक उके यांची निवड झाली.