मेधा पाटकर : नशामुक्त भारत आंदोलन राष्ट्रीय यात्रा नागपुरातनागपूर : राज्यासह देशातील गुन्हेगारी घटनांना दारू हे मुख्य कारण असते. तरीदेखील महसुलाचा आकडा लक्षात घेऊन राज्य शासनातर्फे त्यावर बंदी लावण्यात येत नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यासंदर्भात पावले उचलली आहेत व तेथे दारुऐवजी दूधविक्री सुरू झाली आहे. राज्यानेदेखील दारुबंदीचा ‘बिहार पॅटर्न’ राबविला पाहिजे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व ‘नशामुक्त भारत आंदोलन’च्या राष्ट्रीय संयोजक मेधा पाटकर यांनी व्यक्त केले. देश नशामुक्त झाला पाहिजे यासाठी नशामुक्त भारत आंदोलनाअंतर्गत राष्ट्रीय यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा शनिवारी नागपुरात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या.अमरावती मार्गावरील विनोबा भावे विचार केंद्रात दारुबंदी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेनंतर पत्रपरिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. दारूपासून मिळणारा महसूल वाढावा यासाठी शासनातील मंत्री, अधिकारी प्रयत्नरत असतात. अधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात येतात. मात्र यामुळे समाजाचे नुकसान होते. दारुबंदीच्या मुद्यावर शासन संवेदनशील नाही, असा आरोप त्यांनी केला. राज्यात बिहारसारखा दारुबंदीवर सशक्त कायदा आणला पाहिजे. यासाठी समाजात जनजागृती करण्याचीदेखील गरज आहे, असे त्या म्हणाल्या. रविवारी ही यात्रा यवतमाळ व तेथून पुसद येथे पोहोचणार आहे़ पत्रपरिषदेला लीलाताई चितळे, मुलताईचे माजी आ़ डॉ़ सुनीलम्, विलास भोंगाडे, भुपेंद्र रावत, राघवेंद्र बालीया, आनंदी अम्मा, इनामूल, शिवाजी मुथ्थूकुमार, बलवंतसिंह यादव, माया चवरे, रजनीकांत, दीपक चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)पाकविरोधातील ‘सर्जिकल स्ट्राईक’ समर्थनीय नाहीचउरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पाऊल उचलण्यात आले. परंतु याचे समर्थन करता येणार नाही. हिंसेचे उत्तर हिंसेने देणे योग्य नाही. भारत-पाकिस्तानमधील समस्यांचे उत्तर युद्धातून मिळणार नाही, या शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केंद्र सरकारच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या निर्णयावर टीका केली. नशामुक्त भारत आंदोलनांतर्गत काढण्यात आलेली राष्ट्रीय यात्रा शनिवारी नागपुरात आली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.गांधी विचारांवर चालणारा आपला देश आहे. शेजारी राष्ट्रांसोबत सौहार्दपूर्ण संबंध असले पाहिजे. चर्चेतूनच सौहार्द निर्माण होते. आत्मसुरक्षेचा सर्वांना अधिकार आहे. परंतु युद्ध हा अंतिम पर्याय असू शकत नाही. देशात ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या माध्यमातून युद्धज्वर पसरविणे अयोग्य आहे. जी कृती पाकिस्तानने केली, तीच भारताने केली तर त्यांच्यात व आपल्यात काहीच फरक राहणार नाही, असे प्रतिपादन पाटकर यांनी केले.कुठे गेले ‘गुजरात मॉडेल’?भाजपाकडून ‘गुजरात मॉडेल’चे खूप कौतुक करण्यात येते. भाजपाशासित राज्यांकडून याचे अनुसरण करण्याचा दावा करण्यात येतो. परंतु या ‘मॉडेल’मध्ये दारुबंदीचा समावेश आहे. याचे अनुकरण करण्यात का येत नाही, असा प्रश्न मेधा पाटकर यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्राने राबवावा दारुबंदीचा ‘बिहार पॅटर्न’
By admin | Updated: October 9, 2016 02:21 IST