लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दत्तवाडी येथील गजानन सोसायटी मैदानात सोमवारी संध्याकाळी महावादनासह मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची महाआरती करण्यात आली. या वेळी संपूर्ण परिसर रामनामाच्या गजराने निनादून उठला.
विश्व हिंदू परिषद नागपूर आणि दी रॉयल शिव संस्कृती फाउंडेशनच्या वतीने हे आयोजन पार पडले. कार्यक्रमात ढोल-ताशा पथकांनी एकसाथ सादरीकरण करत नागरिकांना मंत्रमुग्ध केले. आम्ही मराठा वाद्य पथक, राजमुद्रा ढोलताशा पथक, शिवसाई ढोलताशा पथक, भगवा ढोलताशा पथक आणि एकदंत ढोलताशा पथकाचे सदस्य यात सहभागी झाले. या वेळी कोरोना महामारीच्या काळात सेवा देणाऱ्या योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी निधी संकलन अभियानांतर्गत गृहसंपर्क अभियानास प्रारंभ करण्यात आला. या वेळी बेलतरोडी येथील गुरुकुल आश्रमचे भगीरथ महाराज उपस्थित होते. प्रमुख वक्ता म्हणून विश्व हिंदू परिषदेचे नागपूर महानगर मंत्री प्रशांत तितरे, महानगर उपाध्यक्ष अमित बेंबी व डॉ. करण माने, बजरंग दल नागपूर संयोजक विशाल पुंज, विश्वजीत राजे, कैलाश शर्मा, धर्मप्रसारप्रमुख नागपूर महानगर भैयाजी चौबे उपस्थित होते.
प्रतिकृती दर्शन
कार्यक्रमस्थळी अयोध्या येथे साकारल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने या प्रतिकृतीसोबत सेल्फी घेतल्या.
........