नागपूर : महाराष्ट्र राज्य किसान महासभा जिल्हाध्यक्ष, शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी नव्या कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर टीका केली. विविध उदाहरणे व आकडेवारी सादर करीत माेदी सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आराेप त्यांनी केला. राष्ट्रीय शिक्षा नीतीविरुद्ध आंदोलन समन्वय समितीच्यावतीने शेती व शिक्षण हक्क परिषदेत ते बाेलत हाेते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, उरुवेला कॉलनी, वर्धा रोड येथे ही परिषद पार पडली. समितीचे राज्य मुख्य समन्वयक अशोक सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेत सीपीआय नेते अरुण वनकर, सत्यशोधक शिक्षक सभेचे अध्यक्ष रमेश बीजेकर यांनी मार्गदर्शन केले. सीपीएमचे जिल्हा सचिव अरुण लाटकर यांनी ठराव वाचन केले. कोरोना आजाराचा दुरुपयोग करून संसदेला दुर्लक्षित करून दरबारी भांडवलदारांना नफा मिळवून देण्यासाठी शेतकरीविरोधी, गरीब आणि महिलांविरोधी क्रूर कायदे करून त्यांना संकटात आणले आहे. त्याविरुद्ध दिल्लीला सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ही परिषद सक्रिय पाठिंबा देत असल्याचा ठराव येथे पारीत करण्यात आला.
रमेश बीजेकरांनी, केंद्र सरकारचे शिक्षण धाेरण हे अंधश्रद्धा, जाती व्यवस्थेला खतपाणी घालणारे असल्याचा आराेप करीत, माेदी सरकारने मनुस्मृतीची प्रतिष्ठापना करून मागासवर्गीय, आदिवासी, दलित आणि महिलांच्या दमनाचे षड्यंत्र रचल्याचा आराेप केला. अशोक सरस्वती यांनी कृषी कायदे व शिक्षण धाेरणाविराेधात समितीने ३६ जिल्ह्यात आंदोलन उभारणी प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले.
संचालन प्रमिला सोनवणे, प्रास्ताविक प्रा. घन:श्याम धाबर्डे यांनी केले, तर यशवंत वासनिक यांनी आभार मानले.