उमरेड : उमरेड पालिकेचे माजी नगरसेवक तथा बिल्डर्स अरुण गिरडकर यांच्या पत्नी विमल यांच्यावर अज्ञात लुटारूंनी बंदुकीचा धाक दाखवून लुटमार केली. गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बंदुकीच्या धाकावर दोन लुटारूंनी सोन्याचे दागिने घेत पोबारा केला.
बुधवारी पेठ या दाट वस्तीत अरुण गिरडकर यांची ‘अरुणोदय-२’, विमल कॉम्प्लेक्स नावाची इमारत आहे. येथे अन्य फ्लॅटधारकांसह अरुण गिरडकर पत्नी विमलसमवेत वास्तव्याला असतात. अरुण हे दुपारी ४ वाजताच्या सुुमारास बाहेर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. अशातच सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास दोन लुटारू त्यांच्या घरात शिरले. दोघांपैकी एकाने विमल यांच्यावर बंदूक ताणली तर दुसऱ्याने त्यांचे हात रुमालाने बांधले. लुटारूंनी त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्याचा गोफ, दोन तोळ्याचे मंगळसूत्र आणि बेन्टेक्सच्या बांगड्या आणि नगदी अंदाजे दोन हजार रुपये असा एकूण दोन लाख रुपयाचा मुद्देमाल हिसकावत पोबारा केला. विमल यांनी लागलीच शेजारच्यांना घटनाक्रम सांगितला. पती अरुण यांनाही कळविले. माहिती मिळतात पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. या दोन्ही लुटारूंचा संवाद मराठीत होता. अंदाजे ३५ वयोगटातील असलेले हे लुटारू डोक्यावर टोपी आणि पांढरा रुमाल बांधून होते, अशी माहिती विमल यांनी पोलिसांना दिली.
मला मारू नका...
विमल गिरडकर यांच्यावर एकाने बंदूक ताणल्यानंतर त्यांचे हात बांधल्या गेले. त्यानंतर त्यांच्या तोंडालाही रुमाल बांधण्याचा प्रयत्न लुटारूंनी केला. ‘मला श्वसनाचा त्रास असून तुम्हाला जे न्यायचे ते न्या मला मारू नका’, अशी विनवणी विमल यांनी लुटारूंना केली. त्यांनी सोन्याचे दागिने आणि त्यानंतर आलमारीमधील सुमारे दोन हजार रुपये घेऊन पळ काढला.