मेडिकल चौक : कंपनीने केली आपल्याच पेट्रोल पंपावर कारवाई नागपूर : शहरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेल भरताना सर्रास चोरी होत असून ग्राहकांना लुटले जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. मेडिकल चौकातील इंडियन आॅईल कंपनी (आयओसी)द्वारा संचालित एका पेट्रोल पंपावर असाच प्रकार उघडकीस आला असता ग्राहकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर कंपनीने धाड टाकून कारवाई केली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. एका सामजिक कार्यकर्त्याने या पेट्रोल पंपाबाबत तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारावर टाकण्यात आलेल्या या धाडीत पेट्रोल पंपावर मार्केटिंग अॅण्ड डिस्ट्रीब्युशन गाईडलाईन्सचे (एमडीजी) उल्लंघन करण्यात आल्याचे निदर्शनास आले. मेडिकल चौकातील या पेट्रोल पंपावर ८ वर्षांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी भेसळ प्रकरणात पेट्रोल पंपाच्या मालकासह एका कर्मचाऱ्याला अटक केली होती. तेव्हापासून कंपनी हा पंप सर्व्हिस प्रोव्हायडरच्या माध्यमातून संचालित करीत आहे. शुक्रवारी रात्री अॅण्टी अॅडल्ट्रेशन क न्झ्युमर सोसायटीचे अध्यक्ष शाहीद शरीफ यांनी या पेट्रोल पंपावरून १ हजार रुपयाचे डिझेल आपल्या कारमध्ये टाकले. परंतु त्यांना कमी डिझेल मिळाल्याने त्यांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना तक्रार पुस्तिका मागितली. परंतु ती उपलब्धच नव्हती. सेल्स आॅफिसरचा नंबर मागितला असतो तो नंबर लागत नव्हता. आवक जावक व स्टॉकची माहिती दर्शविण्यात आलेली नव्हती. तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न करीत असल्याने काही कर्मचारी त्यांच्याशी असभ्यपणे वागले. त्यामुळे शरीफ यांनी तातडीने आयओसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडे तक्रार केली. शनिवारी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकांनी पेट्रोल पंपाची चौकशी करण्यासाठी एक चमू पाठविली.हे एक उदाहरण असेल तरी शहरातील बहुतेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेलची चोरी होत असून ग्राहकांना लुटले जात आहे. ही चोरी म्हणजे ग्राहकांच्या अधिकारांचे हनन आहे. पेट्रोल पंपांवरील हा प्रकार सर्रास सुरू असूनही कारवाई करण्याबाबत कंपनीचे अधिकारी उदासीन आहेत. पेट्रोल -डिझेलच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत त्यातही चोरी होत असेल तर ती सहन करणार तरी कशी? तेव्हा ग्राहकांनी लूट होत असल्याचे निदर्शनास येताच पेट्रोल पंपावर तक्रार पुस्तकाची मागणी करावी आणि त्यात आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन अॅण्टी अॅडल्ट्रेशन कन्झ्युमर सोसायटीचे अध्यक्ष शाहीद शरीफ यांनी केले आहे. (प्रतिनिधी) कर्मचाऱ्यांचेही शोषण शहरातील पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांना पीएफ क्रमांक देण्यात आलेला नाही. नियमानुसार ज्या संस्थेमध्ये १५ ते २० कर्मचारी ज्या संस्थेत असतात तिथे पीएफ लागू करावा लागतो. परंतु शहरातील बहुतांश पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना पीएफ लागू नाही. वेतनही कमी दिले जाते. सूत्रांनुसार या कर्मचाऱ्यांना वरच्या कमाईची सूट दिली जाते. त्यामुळे पेट्रोल व डिझेलमध्ये चोरी केली जाते.
पेट्रोल पंपांवर ग्राहकांची लूट
By admin | Updated: August 24, 2014 01:14 IST