नागपूर : नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या सर्व वस्त्यांमध्ये १५ ते २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक व्यावसायिक संघटनांनी आज पालकमंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. या सर्व संघटनांनी नागरिकांच्या जीविताला अधिक महत्त्व देत, या काळात प्रशासनाच्या निर्णयाचा आदर करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
शहरातील नागरिक व व्यावसायिकांना पुरेसा दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. शनिवार-रविवार या दोन्ही दिवसांत गरज नसेल तर घराबाहेर नागरिकांनी पडू नये असे आवाहनही करण्यात आले होते. तथापि, ही बाब पुरेशी नसल्याने सोमवारपासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊन काळात संचारबंदीदेखील जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता अन्य कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या पार्श्वभूमीवर आज नागपूर रेसिडेन्सी हॉटेल शिष्टमंडळ, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे शिष्टमंडळ, कूलरनिर्मिती व्यवसायात असणारे व्यावसायिक, फुलांचा व्यवसाय करणारे व्यावसायिक, तसेच बांधकाम व्यावसायिक, ऑरेंज सिटी स्टोन क्रशर असोसिएशन व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी या सर्व शिष्टमंडळाला एक आठवडा सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
बॉक्स
लॉकडाऊन संचारबंदीसह
तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पोलीस व महसूल यंत्रणेला १५ ते २१ या काळामध्ये रस्त्यावरची गर्दी कमी करण्यासाठी कडक धोरण अवलंबण्याचे निर्देश दिले. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रुग्णवाढीची कडी तोडण्यासाठी हा बंद कडेकोट ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले याशिवाय आरोग्य यंत्रणेला निर्देश देताना त्यांनी या काळात लसीकरणाला गती देण्याचेही निर्देश दिले.