नरखेड : नोंदणी व मुद्रांक विभागातील अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने सर्व संवर्गातील पाच ते सहा वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नती करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अनेकदा लक्ष वेढले. मात्र मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने मंगळवारपासून सर्व अधिकारी व कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. मंगळवारी दिवसभर शहरातील कार्यालयाला कुलूप होते. दस्तनोंदणी न झाल्यामुळे शासनाच्या महसुलावर परिणाम आला. तसेच नागरिकांचीही गैरसोय झाली. प्रभारी दुय्यम निबंधक दिलीप वाघ यांनी सोमवारचे (दि. २०) कामकाज पूर्ण करून कार्यालयाचे कुलूप सील करून चावी तहसीलदार यांच्याकडे सुपुर्द केली होती.
पदोन्नती कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय नवीन सेवानियम लागू न करणे, विभागातील सर्व रिक्त पदे तत्काळ भरणे, वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक यांच्या सेवाज्येष्ठता याद्या २०१८ पासून प्रलंबित आहेत. त्या अंतिम करणे, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ ५० लाखांची मदत करणे यांसह विविध मागण्या प्रलंबित आहेत.
बेमुदत संपामुळे विक्रीपत्र, बक्षीसपत्र, हक्कसोड लेख, वाटणीपत्र, गहाणखत, मालमत्तेचे मूल्यांकन, मालमत्तेचे सर्च ही सर्व कामे बाधित होणार आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊन आर्थिक नुकसानही सहन करावे लागणार आहे. शासनालाही मोठा आर्थिक फटका बसणार आहे.