१२.६० लाखांचे वाटप : कर्जाची परतफेड केलेल्यांनाच कर्जनागपूर : रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला आपला कारभार पुन्हा सुरू करण्याची परवानगी बहाल केल्यानंतर महिन्यांत शेतकऱ्यांना १२.६० लाख रुपयांचे खरीप कर्ज वाटप केले आहे. कर्जाची परतफेड केलेल्यांनाच कर्ज मिळेल, असा इशारा बँकेने दिला आहे. खरीप हंगाम सुरू व्हायला अद्याप बराच कालावधी आहे. पण बँकेने कर्ज वाटपाला सुरुवात केली आहे. कर्ज वाटप सप्टेंबरपर्यंत होणार आहे, पण शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जूनपर्यंत कर्ज वाटपाला वेग राहणार आहे. अन्य बँकांच्या तुलनेत कर्जवाटप सोपेशेतकऱ्यांसाठी ही बँक सुरू होणे अत्यंत गरजेचे होते. बँकेने २०१४ च्या खरीप हंगामासाठी कर्ज वाटप केले होते. रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक निर्बंधानंतर खरीप आणि रब्बी पिकांसाठी कर्ज वाटप बंद झाले. २०१५ च्या हंगामात कर्ज वाटप बंद होते. शेतकऱ्यांना जिल्हा बँकेतून अत्यंत सोप्या पद्धतीने कर्ज मिळते. त्यामुळेच शेतकऱ्यांची हक्काची बँक म्हणून या बँकेला मान्यता आहे. एक लाखापर्यंत बँकेचा व्याजदर शून्य टक्के आहे. मध्यंतरी शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडे कर्जाची मागणी केली तेव्हा त्यांना विविध कागदपत्रांच्या मागणीमुळे त्रास झाला. त्यातच शिक्षकांचे खाते अन्य बँकेत सुरू झाल्यामुळे त्यांचीही ओव्हरड्राफ्ट मिळविण्यात पंचाईत झाली. त्यामुळे जिल्हा बँक तातडीने सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे लावून धरली होती. आता शेतकऱ्यांना सुलभरीत्या कर्ज मिळणार आहे. (प्रतिनिधी)कर्ज फेडणाऱ्यांनाच कर्ज१४ मार्च २०१६ ला बँकेला आर्थिक परवाना मिळाल्यानंतर बँकिंग व्यवहाराला वेग आला आहे. नागपूर भागातील शेतकऱ्यांना आता बँकेच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे. अनेकांना वेळोवेळी कर्जेही उपलब्ध होतील. आॅक्टोबरपर्यंत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप करण्यात येणार आहे. पूर्वी कर्जाचा भरणा केलेल्या वा आता करीत असलेल्यांचा नंतर विचार करण्यात येणार आहे. प्रारंभी जवळपास १०० कोटींचे, नंतर ५० कोटींचे कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे. एक लाखापर्यंत शून्य टक्के आणि दोन लाखांपर्यंत दोन टक्के व्याजदराने कर्जवाटप होणार आहे.
जिल्हा बँकेचे शेतकऱ्यांना कर्ज
By admin | Updated: April 17, 2016 02:50 IST