लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाने हातचे काम हिरावून घेतल्याने बेरोजगार बनलेल्या नवऱ्याचा बायकोनेही छळ चालवला आहे. पोलिसांकडे गेल्या काही दिवसांत कौटुंबिक तक्रारीची संख्या वाढली आहे. गेल्या ७ महिन्यात १०९९ कौटुंबिक तक्रारी आल्या. त्यात पुरुषांच्या १०३ तक्रारींचा समावेश आहे. त्यावरून याचा प्रत्यय यावा.
काम सुटल्यामुळे अनेकांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. नवरा सारखा समोर असल्याने अनेक बायकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना मनात येईल तेव्हा आणि मनात येईल तेथे जाणे शक्य होत नसल्याने काही बायका नवऱ्यावर राग काढू लागल्या आहेत. मोबाईलच्या माध्यमातून झालेली फेसबुकवरची मैत्री अन् सलगची चॅटिंगही सुखी संसारात आग लावत आहे.
अनेक प्रकरणात विवाहबाह्य संबंध उघड झाल्याने अनेक बायका नवऱ्यावर हावी झाल्या आहेत. त्यामुळे अशी प्रकरणे पोलिसांकडे पोहोचत आहेत.
-----
असे आहे तक्रारीचे स्वरूप
सतत मोबाईलवर बोलणे आणि चॅटिंग करणे.
लपून छपून बाहेर जाण्याचा प्रयत्न करणे. उलटून बोलणे. मुजोरी करणे. नवऱ्याला, त्याच्या नातेवाईकांना कमी लेखणे, वारंवार माहेरी निघून जाणे, तशी धमकी देणे,
सासू-सासऱ्यांना तिटकाऱ्याची वागणूक देणे.
-----
((कोट))
कौटुंबिक वादाच्या तक्रारीत परस्पराविषयीचे गैरसमज आणि संशय वाढला आहे. त्यामुळे त्यांचे योग्य समुपदेशन करून आम्ही तुटू पाहणारे संसार जोडण्याचे प्रयत्न करतो. पती-पत्नी वेगळे झाले तर त्यांच्या मुलांवर त्याचा फारच प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे कोणत्याही दाम्पत्याने वेगळे होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.
- सीमा सुर्वे
पोलीस निरीक्षक,
भरोसा सेल, नागपूर.
----
((बॉक्स))
वाद टाळावे
लॉकडाऊनमुळे बराच वेळ पती-पत्नी एकमेकांसमोर राहतात. त्यामुळे शब्दाने शब्द वाढत जातो आणि छोट्याशा वादाचा भडका उडतो. पती-पत्नी हिंसक होतात. हे टाळण्यासाठी वाद सुरू होताच त्यांनी वेगवेगळ्या रुममध्ये जाऊन संगीत ऐकावे, वाचन करावे, टीव्हीसमोर बसावे. त्यामुळे वादाची तीव्रता कमी होईल. त्यामुळे संसाराची घडी नीट राखण्यास मदत होईल.
---
((कोट))
महिला म्हणून त्यांना प्रत्येकाची सहानुभूती मिळते. कायद्याचाही त्यांना भक्कम आधार आहे. पुरुषाला न कुणाची सहानुभूती न कुणाचा आधार. त्यात बदनामीचा धाक. त्याचमुळे महिला सर्रास कायद्याचा दुरुपयोग करत आहेत. अनेक प्रकरणात ते उघडही झाले आहे.
- एक पत्नी पीडित