लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाच महिन्यांपूर्वी सुपारीच्या बाजारात आपल्या नावाचा गवगवा करून घेणारा कुख्यात सलीम जमोनी खादिम हुसेन नामक (वय ४५) व्यापाऱ्याने शहरातील अनेक सुपारी व्यापाऱ्यांना चुना लावला. व्यापाऱ्यांकडून १ कोटी ३४ लाख ४० हजारांची सुपारी घेऊन आरोपी सलीम पळून गेला.
सूत्रांच्या माहितीनुसार, सलीम जमोनी पाच महिन्यांपूर्वी गुजरातहून नागपुरात आला. टेलिफोन एक्स्चेंज चाैकाजवळच्या राजेश्री पॅलेसच्या २०१ क्रमांकाची सदनिका घेऊन त्याने आपली दुकानदारी सुरू केली. सुपारीचे मोठ-मोठे साैदे करून त्याने आपल्या नावाचा गवगवा केला. ईतवारीतील सुपारीचे ठोक व्यापारी हितेंद्र नटवरलाल मेहता (वय ४०) आणि अन्य काही सुपारीवाल्यांकडून त्याने २ ऑक्टोबर २०२० ते ४ जानेवारी २०२१ दरम्यान १ कोटी ३४ लाख ४०,७६१ रुपयांची सुपारी विकत घेतली. काही दिवस दुकान सुरू ठेवल्यानंतर त्याने गाशा गुंडाळला. तो पळून गेल्याने हवालदिल सुपारीवाल्यांनी सलीमसोबत आपल्या पैशांसाठी वारंवार संपर्क केला. मात्र, त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्यांनी तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. मेहता यांच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी बुधवारी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
----