लघुपटांचे चित्रीकरण : एकनाथ रानडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आठवणींना उजाळानागपूर : संघ मुख्यालयाचे नाव घेतले की डोळ्यासमोर येते ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीने भारलेले, चिंतन आणि गंभीर चर्चांनी भारलेले वातावरण. परंतु मंगळवारी संघ मुख्यालयाचा परिसर पूर्णच बदलला होता. येथे उपस्थित प्रत्येकाची वेगळीच घाई सुरू होती अन् ‘दक्ष’,‘आरम्’ ऐवजी चक्क ‘लाईट...कॅमेरा... अॅक्शन’चे निर्देश ऐकू येत होते.कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने तयार होत असलेल्या लघुपटांचे चित्रीकरण संघ मुख्यालयाच्या परिसरात करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेले रानडे आपल्या संघटनात्मक कामासाठी ओळखले जायचे. विवेकानंद स्मारक आणि कन्याकुमारी येथे विवेकानंद केंद्र यांचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता. त्यांच्या कार्याला सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी एकनाथ रानडे यांच्यावर हा लघुपट तयार करण्यात येत आहे. याचेच चित्रीकरण महाल येथील संघ मुख्यालय आणि डॉ. हेडगेवार यांच्या निवासस्थानी झाले. रानडे यांच्या डॉ. हेडगेवार, संघ मुख्यालय यांच्याशी जुळलेल्या आठवणींचे चित्रीकरण येथे पार पडले. (प्रतिनिधी)
संघ मुख्यालयात ‘लाईट..कॅमेरा...अॅक्शन’!
By admin | Updated: December 4, 2014 00:42 IST