पंचशील चौकातील घटना : दोन लुटारूंचे कृत्य नागपूर : १५ लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून दोन लुटारू पळून गेले. पंचशील ते मेहाडिया चौक या अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील पत्रकार भवनासमोर शनिवारी रात्री ९.१५ च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. उमेश गोविंदराम जोशी (वय ४५) यांचे भाजपाच्या धंतोली कार्यालयाजवळ पहिल्या माळ्यावर रियल कॉम्प्युटर शॉप आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री ९.१५ च्या सुमारास त्यांनी शोरूम बंद केली आणि स्कूल बॅगमध्ये १५ लाखांची रोकड भरून ते खाली उतरले. फूटपाथवर त्यांची दुचाकी (स्कुटर) होती. दुचाकीची डिक्की उघडून रोकड असलेली बॅग डिक्कीत ठेवताक्षणीच दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या तरुणाने ती बॅग उचलली. भाजपा कार्यालयासमोर त्याचा दुचाकीस्वार साथीदार तयारीत होता. त्या दुचाकीवर बसून लुटारू हॉस्पिटल गल्लीतून पळून गेले. अचानक झालेल्या या घटनेमुळे जोशी गोंधळले. मात्र, दुसऱ्याच मिनिटात त्यांनी लुटारूंचा पाठलाग सुरू केला. त्यांच्यासोबत त्यांच्याकडे काम करणारे तरुणही होते. वाकडे तिकडे पळत लुटारू रामकृष्ण मठाजवळून दिसेनासे झाले. जोशी यांनी या घटनेची माहिती धंतोली ठाण्यात दिली. धंतोलीचे पीआय संख्ये, एपीआय सोनवणे, पीएसआय तेजस मेश्राम, नम्रता जाधव, नितीन जावळेकर आदी घटनास्थळी धावले. आजूबाजूच्या परिसरात आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती कळताच गुन्हेशाखेच्या डीसीपी दीपाली मासिरकर,एसीपी नीलेश राऊत, पीआय गायकवाड , धंतोलीचे एसीपी बुधवंत, यांच्यासह ताफा घटनास्थळी पोहचला. वृत्त लिहिस्तोवर आरोपींचा धागादोरा गवसला नव्हता.(प्रतिनिधी)ओळखीच्याचे काम जोशी खाली उतरून रोकड असलेली बॅग दुचाकीच्या डिक्कीत ठेवतात न ठेवतात तोच लुटारू ती रोकड लंपास करतो, यावरून जोशी यांच्या व्यवहाराची माहिती त्याला असावी, असा अंदाज पोलिसांनी काढला आहे. अर्थात् जोशी यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीने ही लुटमार केली असावी किंवा टीप देऊन लुटमार घडवून आणली असावी, असा पोलिसांना संशय वाटतो. दरम्यान, १५ लाखांची ही रोकड दोन तीन दिवसांच्या व्यवहारातून गोळा झाली होती, असे जोशी यांच्या निकटवर्तीयाने घटनास्थळी लोकमत प्रतिनिधीला सांगितले.
१५ लाखांची बॅग लिफ्टींग
By admin | Updated: July 5, 2015 02:44 IST