राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री भगवान यांच्याशी विशेष संवादयोगेंद्र शंभरकर नागपूरवन ही खुली संपत्ती आहे. त्यामुळे लोकांनी वनांना आपल्या पुढील पिढीची संपत्ती समजून त्याचे संरक्षण केले पाहिजे तरच वनसंपदा वाचेल. पर्यावरणाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. तसेच वनांच्या संरक्षणासाठी वाघ आवश्यक आहे. जंगलातील प्रत्येक छोट्या-मोठ्या वन्यजीवांसह नैसर्गिक जैवविविधतेचे विशेष महत्त्व असल्याचे मत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री भगवान यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत व्यक्त केले. पीसीसीएफ श्री भगवान आपल्या मृदु स्वभावासाठी वन विभागात परिचित आहे. त्यांनी १९९८ मध्ये ताडोबा येथे मुख्य वनसंरक्षक पदावर असताना देशात सर्वप्रथम गाईड प्रथा सुरू केली होती. त्यांच्या मते, या माध्यमातून जंगलाशेजारच्या गावातील तरुणांना रोजगार मिळावा, हा त्यामागील उद्देश होता. गावातील तरुणांना जंगलाच्या माध्यमातून रोजगार मिळाला तर त्यांच्यामध्ये जंगलाची सुरक्षा करण्याची भावना निर्माण होईल. आजही आपण त्याच विचारावर ठाम असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कदाचित यामुळेच भगवान यांनी मागील दोन वर्षांपासून पावसाळ्यात जंगल सफारी बंद ठेवण्याची प्रथा मोडित काढली आहे. पावसाळ्यात व्याघ्र प्रकल्प किंवा अभयारण्यातील जंगल सफारी बंद केल्यास तेथील जिप्सी चालक तथा गाईड बेरोजगार होईल, आणि त्यांच्या समोर कुटुंबाचे पोट भरण्याचा प्रश्न उभा ठाकेल. यात कुणी शिकाऱ्यांच्या प्रलोभनाला बळी पडून चुकीचे काम सुद्धा करू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात पक्क्या रस्त्यांनी जंगल सफारी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे भगवान यांनी स्पष्ट केले. श्री भगवान यांची १९८३ मध्ये पहिली नियुक्ती ही आलापल्ली येथील अतिदुर्गम वनक्षेत्रात झाली होती. यानंतर त्यांनी तब्बल सहा वर्षे गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात काम केले. त्यांनी वनसंरक्षक असताना वाहनगस्ती ऐवजी पायी गस्तीलाच महत्त्व दिले. त्यांच्या मते, वाहनगस्तीपेक्षा पायी गस्तीचा अधिक फायदा होतो. निसर्ग सृष्टीचा आनंद घ्या श्री भगवान म्हणाले, अनेक पर्यटक वाघाचे दर्शन होताच जंगलातून काढता पाय घेतात. परंतु जंगलात केवळ एकटा वाघच राहत नाही, तर तेथे अनेक दुसरे वन्यजीव सुद्धा राहतात. त्यामुळे पर्यटकांनी त्या वन्यप्राण्यांसह निसर्ग सौदर्य पाहण्याचा आनंद लुटला पाहिजे. शिवाय वाघाचे विश्व फार मोठे आहे. त्यामुळे त्याला समजून घ्यायला अनेक वर्षे लागतात. प्रत्येकाची स्वतंत्र ओळख असावीप्रशासनात काम करताना कोण कोणत्या राज्यातील आहे, याला मी कधीच विचार केला नाही. तर केवळ माणसाला महत्त्व दिले आहे. मात्र प्रत्येक व्यक्तीची एक स्वतंत्र ओळख असली पाहिजे. त्यासाठीच आपण १९७० मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण होताच न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून आपल्या नावामागील आडनाव हटविले. तेव्हापासून कुणीच आडनावाने ओळखत नसून, केवळ श्री भगवान अशी ओळख निर्माण झाली आहे. श्री भगवान यांचे गुपित राज्याचे पीसीसीएफ श्री भगवान यांचा बिहारमधील पाटणा येथे जन्म झाला असून, तेथेच त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. यानंतर त्यांनी दिल्ली येथे उच्च शिक्षण घेतले. शिवाय फेब्रुवारी १९८१ मध्ये त्यांनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर झालेल्या मुलाखतीत त्यांना भारतीय वन सेवा आणि जंगलाविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. परंतु श्री भगवान यांनी कधीच जंगल बघितले नव्हते. मात्र त्यांची भारतीय वन सेवेसाठी निवड झाली. हीच परमेश्वराची इच्छा होती, असे यावेळी श्री भागवान यांनी सांगितले.
वनांना आपले समजा, तरच वनसंपदा वाचेल!
By admin | Updated: October 9, 2016 02:31 IST