नागपूर : शहरातील विविध शाळांमध्ये दररोज ‘फी’वरून पालक व शाळा प्रशासन तणाव वाढत आहे. हा ताणतणाव शिक्षण अधिकारी, शिक्षण उपसंचालकांच्या दरबारात जात आहे. शाळांना पत्र, पालकांना समजाविणे हा सर्व प्रकार गेल्या काही महिन्यांपासून शहरात बघायला मिळत आहे, पण कुठेही तडजोड झाली नाही, वादही मिटला नाही; परंतु पहिल्यांदा शाळेच्या फीवरून लोकप्रतिनिधींना फटका बसला. स्वत:ला चिमटा लागल्याने लोकप्रतिनिधींनी या वादात उडी घेतली. पालकांना सोबत घेत वर्धमाननगर परिसरातील स्वामीनारायण स्कूलमध्ये आंदोलन केले. शेवटी शाळेने नमते घेत तडजोड करून वाद मिटविला.
वर्धमाननगर परिसरातील स्वामीनारायण स्कूलच्या विरोधात बुधवारी सकाळी पालक रोष व्यक्त करीत होते. या पालकांनी शाळेची फी न भरल्याने त्यांच्या पाल्यांना शाळा प्रशासनाने ऑनलाईन क्लासमधून रिमूव्ह केले होते. पालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, असे जवळपास ८०० विद्यार्थी होते. पालकांचा शाळेपुढे संताप व्यक्त होत असताना, शाळा प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद पालकांना मिळत नव्हता. संताप व्यक्त करणाऱ्या पालकांबरोबरच लोकप्रतिनिधींच्या पाल्यांनाही शाळेने ऑनलाईन क्लासमधून रिमूव्ह केले. यावेळी शाळा प्रशासनाची गाठ लोकप्रतिनिधींशी होती. उपमहापौर मनीषा धावडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष बाल्या बोरकर यांची मुले या शाळेत शिकत आहेत. त्यांना शाळा प्रशासनाने फी न भरल्यामुळे रिमूव्ह केले होते.
त्यामुळे संतापलेल्या लोकप्रतिनिधींचा संताप शाळा प्रशासनाला सहन करावा लागला. लगेच शाळा प्रशासनाने मुलांना ऑनलाईन क्लासमध्ये कनेक्ट करून घेतले. पालकांसमोर येऊन शाळा प्रशासनाने केलेली चूकही मान्य केली.