नागपूर : एलबीटी (स्थानिक संस्था कर) न भरता वैद्यकीय चिकित्सा उपकरण खरेदी करून शहराच्या सीमेत आणल्याप्रकरणी मंगळवारी महापालिकेच्या एलबीटी पथकाने खामला येथील लाईफ केअर इस्पितळावर धाड घातली. या इस्पितळाने एलबीटीची नोंदणी देखील केलेली नाही. एलबीटी न भरल्याच्या कारणावरून शहरातील एखाद्या इस्पितळावर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. इस्पितळातर्फे २८.५0 लाख रुपयांच्या वैद्यकीय उपकरणांची खरेदी शहराच्या सीमेबाहेर करण्यात आली होती. ११ आयसीयू बेड, ११ मॉनिटर, एक एक्स रे मशीन, एक सीआय मशीन, एक डायलिसिस मशीनचा यात समावेश आहे. संबंधित मशीनवर एलबीटी जमा करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता यावर पाच पट दंड आकारला जाईल. दंडाची रक्कम ६ लाख ५0 हजार रुपये एवढी होते. नियमानुसार प्रत्येक इस्पितळाने एलबीटीनोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र, बहुतांश इस्पितळांनी आजवर एलबीटी नोंदणी केलेली नाही. त्यामुळे शहराच्या बाहेर उपकरण खरेदी करून ते शहरात आणणारी इस्पितळे संकटात येऊ शकतात. लाईफ केअर इस्पितळाच्या बाबतीत महापालिकेच्या एलबीटी विभागाला माहिती मिळाली होती. त्या आधारावर पथकाने तपासणी केली. पुरावे गोळा केल्यानंतर एलबीटी पथकाने एमएमसी अँक्टच्या कमल १५२ अंतर्गत इस्पितळावर धाड घातली. कारवाई दरम्यान एलबीटी न भरलेली उपकरणे सील करण्यात आली. एलबीटी नोंदणी न करून लाईफ केअर इस्पितळाने नियम ९ (१) चे उल्लंघन केले आहे. (प्रतिनिधी)
लाईफ केअर हॉस्पिटलवर एलबीटी धाड
By admin | Updated: May 14, 2014 00:51 IST