टोमणे मारल्याचा राग : दोघांना अटक नागपूर : बेरोजगार असल्याचे टोमणे सहन न झाल्यामुळे दोघांनी एका मजुराची निर्र्घृण हत्या केली. हरिदास महादेवराव शेंदरे (वय ५१) असे मृताचे नाव आहे. तर त्याला मारणाऱ्या आरोपींची नावे गौतम ऊर्फ गोलू उबाळे आणि रूपेश लांजेवार अशी आहेत. त्यांना पोलिसांनी रात्री अटक केली. लक्ष्मीनगरसारख्या शांत भागात गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास झालेल्या या हत्येच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गोपालनगरात राहणारा हरिदास शेंदरे हा कार वॉशिंग आणि लॉनमध्ये साफसफाईचे काम करायचा. त्याला प्रफुल्ल आणि शेखर ही दोन मुले आहेत. प्रफुल्ल एका इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीत कार्यरत असून, शेखर मेट्रो प्रकल्पात कामाला आहे. शेंदरेची पत्नी धुणीभांडी करते. रोज रात्रीच्या वेळी तो लक्ष्मीनगरातील जैन मंदिराजवळ एका लॉन्ड्री(ईस्त्री)वाल्याकडे येऊन बसायचा. तेथे कुसाटे नामक केबल आॅपरेटर आणि अन्य काही जण येऊन बसायचे. कधी ही मंडळी येथेच बसून दारू प्यायची तर कधी ते बाहेरून दारू पिऊन येथे बसून चकाट्या पिटायचे. आरोपी गौतम हा एका नामांकित स्कूलच्या व्हॅनवर चालक म्हणून कार्यरत होता. (त्याचे वडील आणि भाऊसुद्धा वाहनचालकच आहेत.) वर्षभरापूर्वी अपघात झाल्याने गौतमचा पाय जायबंदी झाला. त्याच्या पायात रॉड टाकण्यात आल्यामुळे त्याला वाहन चालविता येत नव्हते. त्यामुळे तो बेरोजगार झाला. आरोपी गौतम हा सुद्धा आपल्या मित्रासोबत लॉन्ड्रीवाल्याजवळ येऊन बसायचा. गौतम आणि केबल आॅपरेटरमध्ये अजिबात पटत नव्हते. दारू पिल्यानंतर कुसाटे गौतमला टोमणे मारायचा. कामधंदा करीत नाही, दारू पिऊन फुकट मस्ती करतो, असे म्हणायचा. चारचौघात नेहमीच तो अपमान करीत असल्याने गौतम त्याला धडा शिकविण्याच्या तयारीत होता. त्यानुसार त्याने आपल्या एका मित्राकडून गुप्ती आणली होती. हत्यासत्र थांबेना! गेल्या सात दिवसातील हत्येची ही आठवी घटना आहे. १७ डिसेंबरपासून नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरीश बावणे या निष्पाप तरुणाच्या हत्येपासून उपराजधानीत हत्यासत्र सुरू झाले. ते थांबायला तयार नाही. त्याच दिवशी अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बग्गा कौरतीची हत्या झाली. त्यानंतर जरीपटक्यातील लव्हप्रीत कौर, हुडकेश्वरमध्ये पंकज तिवारी, अयाज कुरेशी तसेच आणखी एकाची हत्या झाली. बुधवारी लकडगंजमध्ये गोलू गच्चीवाले याची हत्या झाली. आता शांत आणि सुशिक्षितांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मीनगर, बजाजनगरसारख्या भागात शेंदरेची हत्या झाल्याने गुन्हेगारांची पिलावळ उपराजधानीतील सर्वच भागात वळवळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लक्ष्मीनगरात मजुराची निर्घृण हत्या
By admin | Updated: December 23, 2016 01:27 IST