लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्हा न्यायालयात वकिली करीत असलेले अॅड. सदानंद नारनवरे (वय ६२) यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांची त्यांच्याच सोबत वकिली करणाऱ्या एका कनिष्ठ वकिलाने हत्येचा प्रयत्न केला. लोकेश भास्कर (वय ३४) असे आरोपीचे नाव असून, त्याने अॅड. नारनवरे यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर स्वत:ही विष पिऊन आत्महत्या केली. जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या दारासमोर शुक्रवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यामुळे परिसरात काही वेळेसाठी प्रचंड थरार निर्माण झाला होता.
संशयाने केला घातमृत्यूशी झुंज देत असलेले अॅड. सदानंद नारनवरे न्यू सुभेदार ले-आऊटमध्ये राहतात. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात प्रोफेसर होते. तेथेच लोकेश भास्कर विधी अभ्यासक्रमाला शिकत होता. तो मूळचा वडेगाव, तिरोडा ( जि. गोंदिया) येथील रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सधन आहे. भाऊ अभियंता तर बहीण पोलीस दलात कार्यरत असल्याचे समजते. तो पत्नीसह इंदोरा भागात राहत होता. एलएलएम केल्यानंतर तीन वर्षांपूर्वी तो जिल्हा न्यायालयात वकिली करू लागला. दोन वर्षांपूर्वी तो नारनवरे यांचा ज्युनिअर म्हणून कोर्टाच्या परिसरात वावरत होता. या दोघांचे कौटुंबिक संबंध दृढ झाल्याने एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. या घटनेनंतर काही वकिलांनी पत्रकारांशी चर्चा करताना अनैतिक संबंधाच्या संशयातून ही घटना घडल्याचे सांगितले. त्यानुसार, काही दिवसांपासून नारनवरे यांच्यासोबत लोकेशच्या पत्नीचा संपर्क वाढला होता. फोनवरही ते सलग संपर्कात होते. ते लक्षात आल्याने लोकेश कमालीचा संतापला होता. नारनवरे त्याला पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते. दुसरीकडे त्याच्या पत्नीला नेहमी आर्थिक मदत करीत असल्याचे लक्षात आल्यानेही तो संतापला होता. पत्नीला या संबंधाने समजावले असता ती दाद देत नव्हती तर अॅड. नारनवरे खेकसल्यासारखे वागत असल्याने त्याचा तिळपापड झाला होता. त्याचमुळे मरण्या-मारण्याच्या इराद्याने लोकेश विष तसेच कुऱ्हाड घेऊन न्यायालयाच्या आवारात पोहचला. नारनवरे यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी त्याने स्वत: विष प्राशन केले आणि नंतर नारनवरेंवर कुऱ्हाडीचे सात ते आठ घाव घातले.
ते निपचित, तो शांत !नारनवरे निपचित पडल्याने ते ठार झाल्याचे समजून आरोपी लोकेश उभा झाला. त्याने कुऱ्हाड बाजूला फेकताच आजूबाजूच्या वकिलांनी त्याच्यावर झडप घातली आणि त्याला बदडणे सुरू केले. यावेळी त्याने मारू नका, मी आधीच विष घेतले आहे, असे सांगितले. त्यामुळे वकिलांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याला कोर्टाच्या आवारातील चौकीत बसवले. तेथे एका ज्येष्ठ वकिलांनी त्याला या घटनेमागचे कारण विचारले असता त्याने त्यांना आपल्या मनातील खदखद बोलून दाखवल्याचे समजते. दरम्यान, या घटनेने विधी वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली असून, घटनेच्या वेळी तेथे एवढी गर्दी जमली की आकाशवाणी चौक ते जीपीओ चौक या मार्गावरची वाहतूक काही वेळेसाठी रखडली होती.