- राजभवन येथे वृक्षारोपण : परिसरातील उद्यान, कचरा व्यवस्थापन, कामाचे केले कौतुक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजभवनमध्ये एक हजार बांबू व एक हजार भारतीय प्रजातीची झाडे लावण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. राजभवनात दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला वृक्षारोपण अभियान राबविण्यात येत असते.
राज्यपालांनी राजभवनातील जलसंधारणाची कामे, हर्बल पार्क, कॅक्टस गार्डन, बर्ड्स रेस्टेराँ, फुलपाखरू उद्यान, कचरा व्यवस्थापन व इतर कामांचा आढावा घेत समाधान व्यक्त केले. यावेळी राजभवनचे प्रभारी अधिकारी रमेश येवले, राज्यपालांचे खासगी सचिव मुणगेकर, वनविकास मंडळाचे ऋतुराज बारटक्के, प्रफुल्ल कुलूरकर उपस्थित होते.
-------------
राजभवन म्हणजे नागपूरचे ऑक्सिजन हब
राजभवनमध्ये सध्याच्या परिस्थितीत एक लाखाच्या आसपास वृक्ष असून, हे नागपूरसाठी ऑक्सिजन हब तयार झाले आहे. यावर्षी या परिसरात बांबू रोपणामुळे आणखी भर पडणार आहे. बांबू इतर वृक्षांपेक्षा ३० टक्के अधिक ऑक्सिजन वातावरणात देत असतो. राजभवन ही निसर्ग समृद्धीने नटलेली १३० वर्षे जुनी वास्तू आहे. येथील १०० एकर पैकी ८० एकरांच्या परिसरात जैवविविधता उद्यान असून, याच परिसरातील काही ठिकाणी बांबूच्या विविध प्रजातींचे रोपण केले जाणार आहे. सोबतच आवळा, बेहडा, हिरडा, कडूनिंब, वड, पिंपळ, पळस अशी झाडेही लावली जाणार आहेत. परिसरातील सर्वच वृक्षांना ठिंबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने येथील संवर्धन स्तर ९५ टक्के इतका आहे. यामुळे हा परिसर कडक उन्हाळ्यातही हिरवाकंच असतो.
..................