ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 10 - बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या पर्समधील १ लाखाचे दागिने चोरट्याने लंपास केले. गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. मंदाबाई मदनराव कुथे (वय ६३, रा. रमाईनगर, नारी) या बाहेरगावी जाण्यासाठी सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास गणेशपेठ बसस्थानकावर आल्या होत्या. २१ क्रमांकाच्या फलाटावर लागलेल्या बसमध्ये चढत असताना झालेल्या गर्दीचा लाभ उठवत चोरट्याने त्यांच्या पर्समधील रोख दोन हजार आणि ९७ हजारांचे दागिने चोरून नेले. ही बाब लक्षात आल्यानंतर मंदाबाई यांनी गणेशपेठ ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.
गणेशपेठ बसस्थानकावर चोरट्यांच्या अनेक टोळ्या खुप दिवसांपासून सक्रीय आहेत. अनेक टोळ्यांमध्ये महिलांचा समावेश आहे. बाहेरगावी जाणा-या सावज हेरून त्या संबंधित महिला-पुरुषाच्या मागेपुढे होतात. चोरट्याचे काही साथीदार संबंधिताचे लक्ष विचलीत करतात नेमक्या काही क्षणात दुसरा चोरटा डाव साधतो. अशा प्रकारे बसमध्ये चढताना नेहमीच चो-या होतात. नागपुरातील प्रवासी चोरीची तक्रार येथे करतो. मात्र, बाहेरगावचे प्रवासी बसमधून गावाला उतरल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांच्या त्यांच्या गावाला तक्रारी करतात. त्यामुळे या टोळीचे फावते. दरम्यान, वारंवार अशा प्रकारच्या चो-या होऊनही गणेशपेठ पोलीस गांभिर्याने चोरट्यांकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने या टोळ्या कमालीच्या निर्ढावल्या आहेत.